तीन दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या किनारपट्टीला वरदा चक्रीवादळाने तडाखा दिला. हे वादळ धडकण्यापूर्वी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोच्या दोन उपग्रहांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे 10 हजार लोकांचे प्राण वाचवणे शक्य झाले. इन्सॅट 3 डीआर आणि स्कॅटसॅट 1 या दोन उपग्रहांकडून मिळालेल्या माहितीमुळे वादळाची तीव्रता आणि दिशेबद्दल अंदाज बांधता आला.
त्यामुळे प्रशासनाला लोकांना वेळीच सर्तक करता आले. इन्सॅट 3 डीआर आणि स्कॅटसॅट 1 ने दिलेल्या माहितीमुळे तामिळनाडूच्या किनारपट्टी भागातून 10 लोकांना सुरक्षित स्थळी हलवता आले. एनडीआरएफच्या टीमने मदत आणि बचावकार्य केले. इन्सॅट 3 डीआर अत्याधुनिक हवामान उपग्रह असून, छायाचित्र काढण्याची सुविधा यामध्ये आहे. जीएसएलव्ही प्रक्षेपदाव्दारे 8 सप्टेंबरला या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. स्कॅटसॅट उपग्रहाचे 26 सप्टेंबरला पीएसएलव्ही प्रक्षेपकाने प्रक्षेपण करण्यात आले.
स्कॅटसॅट 1 ही हवामान आणि वादळाच्या पूर्वसूचनेची माहिती देतो. वरदा चक्रीवादळाच्यावेळी सतीश धवन अवकाश केंद्राजवळही जोरदार वा-यासह मुसळधार पाऊस कोसळला. पण इस्त्रोच्या तळाचे फार नुकसान झालेले नाही अशी माहिती अधिका-यांनी दिली.
