गेले दोन महिने उपचार घेत असलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांची हृदयक्रिया बंद पडल्याचे (कार्डियाक अॅरेस्ट) अपोलो इस्पितळाने रविवारी रात्री जाहीर केले. इस्पितळाने त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले असले, तरी जयललिता यांना ‘लाइफ सपोर्ट’ यंत्रणेवर ठेवण्यात आल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच, प्रभारी राज्यपाल सी. विद्यासागर राव तातडीने मुंबईहून चेन्नईला रवाना झाले.
राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री व मुख्य सचिवांनीही इस्पितळात धाव घेतली. पोलीस महासंचालकही मदुराईहून लगेच राजधानीत परतले व त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात वाढीव बंदोबस्त ठेवण्याच्या व गरज पडल्यास केंद्रीय दलांच्या तुकड्या मागवून घेण्याचेही आदेश दिले.
दिल्लीच्या ‘एम्स’च्या तज्ज्ञ डॉक्टरांनी ‘अम्मा’ना तपासले व त्या आता पूर्ण बऱ्या झाल्या असून लवकरच घरी परततील, अशी खूशखबर त्यांनी दिली आहे, असे सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाने कळविल्यानंतर, काही तासांतच अपोलो इस्पितळाने जयललिता यांच्याविषयी काळजी वाढविणारी बातमी दिली.

