भारतरत्न उस्ताद बिस्मिला खां यांच्या सनई चोरीला गेल्या आहेत. घरातून चांदीच्या पाच सनईंची चोरी झाल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात एफआयर दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळाची पाहणी करत असून क्राईम ब्रांचलाही तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत बिस्मिला खां यांनी सनईची साथ सोडली नव्हती. झोपतानाही ते सनई शेजारी ठेवून झोपायचे.
वाराणसीतील राहत्या घरातून या पाचही सनई चोरण्यात आल्या आहेत. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री सनईंची चोरी झाली असून त्यातील एक सनईच्या द्वारे मोहरमच्या पाचव्या आणि आठव्या दिवशी आपली कला सादर करत. सनईंसोबत चोरांनी दागिन्यांवरदेखील डल्ला मारला आहे. चांदीच्या या सनईंमधील एक कपिल सिब्बल, दुसरी लालू प्रसाद यादव आणि तिसरी माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि शैलेश भगत यांनी दिली होती.
30 नोव्हेंबर रोजी आम्ही हडहा सराय येथील जुन्या घरी गेलो होते. शनिवारी रात्री 9 च्या सुमारास परत आलो तेव्हा घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं अशी माहिती उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचा मुलगा काजिम याने दिली आहे.
बिस्मिला खां यांच्या सनईंची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये येण्याची ही पहिलीचे वेळ नसून 2009 मध्ये त्यांचा मुलगा नाजीम हुसेन याने सनई चोरीला गेल्याचा दावा केला होता. नाजीम हुसेन याने 2009 मध्ये सनई चोरीला गेली असून यामध्ये घरच्यांचाच हात असल्याच आरोप केला होता. याप्रकरणी त्याने सीबीआय चौकशीची मागणीदेखली केली होती. नाजीम हुसेनने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी कार्यालयात पत्र पाठवत आपल्या वडिलोपार्जित घराला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणीदेखील केली होती. मात्र तपासादरम्यान कौटुंबिक वादातून हे सर्व आरोप-प्रत्यारोप होत असल्याचं समोर आलं होतं.

