काश्मीरमध्ये तीन जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे. काश्मीरच्या मच्छल विभागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात भारताचे तीन जवान शहीद झाले. पाकिस्तानने आपला क्रूरपणा कायम ठेवत एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना केल्याचे उघड झाले. यामुळे भारतात संतापाची लाट पसरली आहे. २९ ऑक्टोबरनंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दुस-यांदा जवानाच्या मृतदेहाची विटंबना केली.

कुपवाडा विभागातील मच्छल उपविभागात सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. त्यानंतर लेफ्टनंट जनरल उपलष्करप्रमुख विपीन रावत यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना या हल्ल्याची माहिती दिली. त्यात तीन जवान शहीद झाल्याची माहिती दिली. त्यातील एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना केल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, मच्छील विभागात पहाटे ३.३० वाजल्यापासून जोरदार गोळीबार होत होता. त्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले.

बांदीपोरात दोन दहशतवादी ठार

काश्मीरात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. या दहशतवाद्यांकडे नवीन दोन हजाराची नोट सापडली आहे. ही नोट लष्कराने पोलिसांकडे सोपवली आहे. ती दहशतवाद्यांकडे कशी गेली याचा तपास सुरू झाला आहे, असे लष्कराच्या अधिका-याने सांगितले. हे दहशतवादी परदेशी असून त्यांनी भारतात घुसखोरी केली होती, असे अधिका-याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *