गुजरातमध्ये आढळली 2,000 रुपयांची बनावट नोट

नोटाबंदीच्या निर्णयानंतर गुजरातमध्ये पहिली 2,000 रुपयांच्या नवीन नोटेची बनावट नोट आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील बोडकदेव येथे स्नॅक्सचे दुकान चालवणा-या वंश बरोट यांना 2,000 रुपयांच्या नोटेची बनावट नोट मिळाली आहे. दरम्यान, देशातील काही भागात नवीन नोटांच्या फोटोकॉपीदेखील (झेरॉक्स) आढळून आल्या आहेत. मात्र, या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे या शॉपचालकाला मिळालेल्या नोटवर राष्ट्रीय चिन्हासहीत महात्मा गांधी यांचा वॉटरमार्क आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नोटेवर असलेली हिरव्या रंगाची पट्टीदेखील दिसत आहे.
एका बँकेशेजारी वंश यांचे ‘आनंद पान शॉप’ आहे. त्यामुळे नोटाबंदी निर्णयानंतर बँकांबाहेर रांगा लावणारे नागरिक या शॉपमधून खाण्यापिण्यासाठी गर्दी करत असल्याने त्यांचाही व्यवसाय जोरात चालत होता. अशा एकाच ग्राहकाने गुरुवारी शॉपच्या कॅश काऊंटरवरील कर्मचा-याकडे 2,000 रुपयांची नोट जमा केली. मात्र, चलनात आलेली नवीन नोट बनावट असेल याची कल्पना न आल्याने त्यानेही ती नोट स्वीकारली. त्यानंतर दिवसाची कमाई किती झाली आहे, याचा हिशेब करण्यासाठी जेव्हा वंशने काऊंटवरच्या गल्ल्यातील पैसे पाहिले,  त्यावेळी 2,000 रुपयांच्या नवीन नोटेचा रंग काहीसा वेगळा दिसल्याने नोट बनावट असल्याची त्यांना शंका आली.
यानंतर, त्याने चलनात आलेल्या 2,000 रुपयांच्या नवीन नोटेचे आणि ग्राहकाकडून मिळालेल्या नोटेची तुलना केली. त्यावेळी ग्राहकाकडून मिळालेल्या नोटेची लांबी तसेच रुंदीने नवीन नोटेपक्षा कमी असल्याचे जाणवल्याने त्याला धक्का बसला. यानंतर तातडीने  ‘लाल दरवाजा येथील ‘सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ब्रांचमध्ये ही नोट घेऊन गेलो. तेथील व्यवस्थापकाने ही नोट बनावट असल्याचे सांगितले’, असे वंश यांनी सांगितले.  दरम्यान, शॉपमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले असून 17 नोव्हेंबर रोजीचे सर्व फुटेज मी पाहिले. मात्र ही नोट कुणाकडून मिळाली हे शोधू शकलो नाही, अशी माहितीही वंशने दिली.
एकीकडे बनावट नोटा आणि काळा पैसा हद्दपार व्हावा, यासाठी  नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आलेला असताना, दुसरीकडे बनावट नोटा आढळून येण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *