भारताने स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू ‘अग्नी-१’ क्षेपणास्त्राची मंगळवारी यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ७०० किमी आहे.
अब्दुल कलाम बेटांवरील एकात्मिक चाचणी केंद्रातून सकाळी १०.१० वाजता मोबाईल लाँचरमधून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आहे. या क्षेपणास्त्राने त्याला दिलेले लक्ष्य उद्ध्वस्त केले.
भारतीय लष्कराच्या स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने प्रशिक्षणाचा भाग म्हणून या क्षेपणास्त्राची चाचणी केली. या क्षेपणास्त्राच्या चाचणीवर अत्याधुनिक रडार, टेलिमेट्री स्टेशन, इलेक्ट्रो-ऑप्टिक यंत्रणा लक्ष ठेवून होतो.
‘अग्नी-१’ या क्षेपणास्त्रात अत्याधुनिक दिशादर्शक यंत्रणा आहे. त्यामुळे हे क्षेपणास्त्र अत्यंत अचूकपणे आपल्या लक्ष्यावर मारा करते. हे क्षेपणास्त्र यापूर्वीच लष्करात दाखल झाले आहे. या क्षेपणास्त्राचे वजन १२ टन असून ते १५ मीटर लांब आहे. हे क्षेपणास्त्र एक टन शस्त्रास्त्र वाहून नेऊ शकते.
