बाद नोटा बदलण्यावरील काही निर्बंध सरकारने शिथिल करताच बँकांमधील अनावर गर्दी आणि गोंधळ बराच कमी झाला असला तरी एटीएम्सवरील गर्दी मात्र वाढतच आहे. रविवारच्या सुटीनंतर सोमवारी बँकांचे कामकाज सुरू झाले व बाद झालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी व पैसे काढण्यासाठी लोकांनी बँकांकडे धाव घेतली. ५०० आणि एक हजार रुपयांच्या चलनी नोटा रद्द करण्याचा निर्णय होऊन १२ दिवस झाल्यानंतरही लोकांना एटीएमवर तासन्तास रांगेत उभे राहिल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. अनेक एटीएम कार्यरत नाहीत किंवा अनेकांकडील रोख रक्कम प्रचंड गर्दीमुळे लवकर संपत आहे. बँकांमध्ये रोख रकमेच्या टंचाईमुळे लोकांचा बँक कर्मचाऱ्यांशी मोठा वाद होत आहे व काही बँक शाखांवर दंगलही झाल्याची वृत्ते देशातून येत आहेत. ज्या कुटुंबांमध्ये लग्न होणार आहे त्यांना आपल्या बँक खात्यातून अडीच लाख रुपये काढता येत नाहीत.
- नवनव्या नियमांनी हैराण
वास्तविक, १७ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारनेच तशी घोषणा केली होती. बँकांचे म्हणणे असे की अजूनही आम्हाला नेमके काय करावे याचे मार्गदर्शन रिझर्व्ह बँकेकडून मिळालेले नाही.
शेतकऱ्यांना आणि विवाहासाठी पैसे उपलब्ध करून द्यावे असे सांगणाऱ्या राजपत्राची (गॅझेट) प्रत घेऊन लोक बँकांच्या शाखेत जातात; परंतु त्यामुळे त्यांचा प्रश्न सुटलेला नाही.
रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेनंतरच विवाहासाठी पैसे काढता येतील. अशा पैशांसाठी खातेदाराने कोणती औपचारिकता पूर्ण करायची याचे नेमके मार्गदर्शन अशा अधिसूचनेत असते, असे सरकारी बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
