कॅमे-याच्या लखलखाटापासून चार हात दूर रहाणा-या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी नऊ वर्षात प्रथमच एक दीर्घ मुलाखत दिली आहे. इंडिया टुडे वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोनिया गांधींनी त्यांचे राजकीय जीवन, कुटुंब, इंदिरा गांधींचा प्रभाव आणि सद्य राजकीय परिस्थितीवर आपले विचार मांडले आहेत.
इंदिरा गांधींशी संबंध नसता तर आज मी राजकारणात नसते असे सोनियांनी सांगितले. राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय सोपा नव्हता. राजकारणात येताना सासूबाई इंदिरा गांधी, पती राजीव गांधी आणि पक्षाचा आदर्श पुढे नेण्याचा एकच विचार माझ्या मनात होता असे सोनियांनी सांगितले.
डॉक्टर, प्राध्यापक, बिझनेसची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील सदस्य त्याच वाटेवरुन चालण्याचा निर्णय घेतात. पण राजकारणात तुम्ही लोकशाही पद्धतीने निवडून येता किंवा पराभूत होता हा फरक असल्याचे सोनियांनी सांगितले.
इंदिरा गांधींची खंबीर नेतृत्व म्हणून ओळख होती. आज नरेंद्र मोदींची इंदिरा गांधींबरोबर तुलना केली जाते या प्रश्नावर सोनियांनी अशा तुलनेचा माझ्यावर कोणताही परिणाम होत नाही. माझे विचार स्पष्ट आहेत. दोघांमध्ये तुलनाच होऊ शकत नाही असे उत्तर दिले.
काँग्रेसच्या भविष्याबद्दल त्यांनी सकारात्मक मत व्यक्त केले. पुढच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पूर्ण बहुमत मिळवेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राजकारणामध्ये एक जिंकतो, एक हरत असतो असे त्यांनी सांगितले.
राहुल गांधीच्या भूमिकेबद्दल त्यांना विचारण्यात आले. राहुल गांधी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारतील का ? या प्रश्नावर त्यांनी राहुलच्या भविष्यातील रोलबद्दल उत्तर देण्यास आपण योग्य व्यक्ती नसल्याचे सांगितले. काँग्रेस यापुढे लढत राहील, संघर्ष करत राहील असे सोनियांनी सांगितले.
