काळा पैसा रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी चलनातील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाचे देशवासियांनी स्वागत करत त्यांचे कौतुकही केले. मात्र, या निर्णयामुळे नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यात मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी आजपासून बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा नागरिकांना बदलून मिळणार आहेत. 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत नोटा बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे.
नोटा बदलून घेण्यासाठी बँकांबाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी पाहायला मिळते आहे. मुंबईसह देशभरात हेच चित्र पाहायला मिळत आहे. येत्या शनिवार आणि रविवारदेखील बँका सुरू असणार आहेत. दरम्यान, नोटांच्या बदल्यात केवळ 100 रुपयांच्या नोटा मिळतील, अशी अपेक्षा करू नये. याबदल्यात चिल्लरही मिळू शकतात, असे आवाहन बँकांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. नोटा बदलून घेण्यासाठी बँकेकडे ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, दलालांचा सुळसुळाट होऊ नये, यासाठी बँकांबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच दलालांकडून पैसे बदलून न घेता बँक, पोस्ट ऑफिसमधूनच आपले पैसे बदलून घ्यावेत, असे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.
