अदलाबदलीत कोऱ्या व १०० रुपयांच्याच नोटा मिळतील अशी अपेक्षा करू नका; बँकांचे आवाहन

मोदी सरकारने ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच बँकांचे व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे मुंबईसह देशभरातील ग्राहकांनी या नोटा बदलून घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे बँकांमध्ये मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे काही ठिकाणी अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मुंबईच्या अंधेरी परिसरातील पंजाब अँण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेत हा प्रकार टाळण्यासाठी बँकेच्या व्यवस्थापकांनी ग्राहकांना एक आवाहन केले आहे. परिसरातील सर्वात मोठी शाखा असल्यामुळे पंजाब अँण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बाहेर आज सकाळी ८ वाजल्यापासून ग्राहकांनी मोठी रांग लावली आहे. यावेळी बँकेच्या व्यवस्थापकांनी बाहेर येऊन ग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. ५०० आणि १००० च्या नोटांच्या अदलाबदलीत ग्राहकांना कोऱ्या आणि १०० रूपयांच्याच नोटा मिळतीलच अशी अपेक्षा करू नका, असे व्यवस्थापकांनी सांगितले. वेळ पडल्यास ग्राहकांना ५०, १० किंवा चिल्लरही घ्यावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बँकेत १०० रूपयांच्या नोटांचा साठा मर्यादित असल्यामुळे ग्राहकांना जास्तीत जास्त दोन हजार रूपयांपर्यंत अदलाबदल करून मिळेल. आमची शाखा अंधेरी परिसरातील सर्वात मोठी शाखा असून आमच्या बँकेचे तब्बल ५० हजार ग्राहक आहेत. त्यामुळे प्रत्येकाला चार हजारांच्या मुल्याच्या नोटा बदलून द्यायच्या झाल्यास १०० रूपयांच्या नोटा पुरणार नाहीत. त्यामुळे हव्या त्या मुल्याच्या नोटा न मिळाल्यास ग्राहकांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालू नये, असे पंजाब अँण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवस्थापकांनी ग्राहकांना सांगितले आहे. तर पुण्याच्या कर्वे रोड येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतून पैसेच नसल्यामुळे ग्राहकांना माघारी जावे लागत आहे. बँकेत नवीन चलनाच्या नोटा उपलब्ध नसल्यामुळे पैसे देता येणे शक्य नाही, असा फलकच बँकेबाहेर लावण्यात आला आहे. मात्र, बँकेकडून ग्राहकांच्या ५०० आणि १०००च्या नोटा स्विकारल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *