…तर डहाणू लोकल बंद करावी लागेल!

डहाणू लोकलमधून प्रवास करण्यावरून पालघर आणि विरारच्या प्रवाशांमध्ये वाद सुरू असल्याच्या पाश्र्वभूमीवर पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दोन्हीकडील प्रवाशांनी हे वाद थांबवले नाहीत तर डहाणूकडील लोकल बंद करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

डहाणू लोकलमधून विरारचे प्रवासी प्रवास करीत असतात. त्यावरून पालघर आणि विरारच्या प्रवाशांमध्ये वाद आहे. गेल्या महिन्यात विरारच्या एका प्रवाशाने केलेल्या तक्रारीवरून डहाणू-पालघरच्या १५ प्रवाशांना अटक करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी डहाणू लोकल विरार स्थानकात आली असता पालघरच्या महिला प्रवाशांनी दरवाजे उघडलेच नव्हते. यामुळे पुन्हा मोठा वाद निर्माण झाला होता.

पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांना या वादाबाबत विचारले असता, दोन्हीकडील प्रवाशांनी हा वाद थांबवला नाही तर डहाणू लोकलच चालू ठेवायची की नाही याबाबत विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. डहाणू लोकल माझ्या प्रयत्नांमुळे सुरू झाल्याची त्यांनी या वेळी आठवण करून दिली. वसई विरार महापालिकेत वनगा आले असता त्यांना पत्रकारांनी याबाबत विचारले होते. यापूर्वी कुपोषणाच्या मुद्दय़ावरून आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *