अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक साजिद खान यांच्या ‘यादो की बारात’ कार्यक्रमात यावेळी अजय देवगण आणि संजय दत्तने हजेरी लावली होती. बरोबर ओळखलात.. संजू बाबा हा फक्त सलमान खानचा चांगला मित्र नाहीए. तर तो अजय देवगणचाही चांगला मित्र आहे. या दोघांनी मिळून ‘यादो की बारात’च्या सेटवर बरीच धमाल मस्तीही केली. त्यांचा हा मस्तीभरा अंदाज सर्वांनाच पाहावयास मिळाला. या कार्यक्रमात अजय, संजय आणि अभिषेक बच्चन उपस्थित होते. या तिघांनीही त्यांचे अनेक किस्से यावेळी सांगितले. विशेष म्हणजे, कार्यक्रमादरम्यान अजय, संजय आणि अभिषेकमध्ये असलेल्या जबरदस्त मैत्रीचा अनुभव आला. भलेही या तिघांच्या वयात अंतर असेल पण त्यांची विचारसरणी आणि खोडी करण्याच्या पद्धती मिळत्याजुळत्या आहेत. त्याचमुळे या तिघांची मैत्री सर्वांपेक्षा वेगळी आणि हटके ठरते.
एकीकडे हे तिघेही वेगवेगळे किस्से सांगत होते. त्याचवेळी, अभिषेकने अजय आणि संजयबद्दल एक खास गुपित सांगितले. पडद्यावर सहसा नृत्य आणि गाण्यापासून दूर राहणा-या या दोन्ही अभिनेत्यांनी अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नात तब्बल सात तास तेही न थांबता डान्स केला होता.
एकाच कार्यक्रमात या तिघांना एकत्र पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळाली. या तिघांमधील शानदार केमिस्ट्रीचा आणखी एक नमुना म्हणजे बॉलीवूडमधील गॉसिप गर्ल कोण ? असे विचारले असता तिघांनीही एकसारखेच उत्तर दिले. या तिघांनीही गॉसिप गर्ल म्हणून करिना कपूरचे नाव घेतले. तिघांच्याही मते बॉलीवूडमध्ये करिना कपूरपेक्षा मोठी गॉसिप गर्ल असूच शकत नाही. ‘यादो की बारात’ हा सेलिब्रिटी टॉक शो आहे. झी वाहिनीवर लागणारा हा सेलिब्रिटी शो ८ ऑक्टोबरला सुरु झाला होता.
