यंदा गणेशभक्तांचा प्रवास सुकर होणार! मध्य रेल्वेकडून मोठा निर्णय, मुंबई-कोकण विशेष रेल्वे धावणार; वाचा सविस्तर वेळापत्रक

आगामी गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून काही अंशी दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवकाळात मुंबईहून कोकणात २४६ विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वेने घेतला आहे. त्यात विनाआरक्षित रेल्वे फेऱ्यांचाही समावेश आहे. या विशेष रेल्वे फेऱ्यांचे आरक्षण १ ऑगस्टपासून खुले होणार आहे. विशेष रेल्वेगाड्या किमान २० ते कमाल २३ डब्यांसह धावणार आहेत. विनाआरक्षित मेमू फेऱ्या १२ डब्यांसह धावणार आहेत.

कोणकोणत्या गाड्या असणार?

गाडी क्रमांक ०११०३/४ सीएसएमटी-सावंतवाडी- सीएसएमटी (३२ फेऱ्या)

०११५१/२ सीएसएमटी-सावंतवाडी- सीएसएमटी (३४ फेऱ्या)

०११५३/४ सीएसएमटी-रत्नागिरी- सीएसएमटी (३२ फेऱ्या)

०११७१/२एलटीटी-सावंतवाडी- एलटीटी (३४ फेऱ्या)

०११३१/२ एलटीटी-सावंतवाडी-एलटीटी द्विसाप्ताहिक (८ फेऱ्या) ०११२९/३० एलटीटी-सावंतवाडी साप्ताहिक (४)

०११६७/८एलटीटी-रत्नागिरी-एलटीटी आठवड्यातून ५ वेळा (२२ फेऱ्या)

०११६५/६ एलटीटी-मडगाव-एलटीटी साप्ताहिक वातानुकूलित (४ फेऱ्या)

०११८५/६ एलटीटी-मडगाव-एलटीटी साप्ताहिक (४ फेऱ्या) आणि पुणे-रत्नागिरी-पुणे १० विशेष फेऱ्या चालवण्यात येतील

आरक्षण तीन टप्प्यांत

विनाआरक्षित म्हणून दिवा-खेड (३२ फेऱ्या) आणि दिवा-चिपळूण-दिवा (३० फेऱ्या) मार्गावर एकूण ६२ मेमू फेऱ्या धावणार आहेत. ११ ते २३ सप्टेंबरदरम्यान मेमू धावणार आहेत. १, २ आणि ३ ऑगस्टला आरक्षण खुले होणार आहे.

महिला डबे ‘संपर्क’ क्षेत्रात

मध्य रेल्वेने मुंबई उपनगरी रेल्वेवरील सर्व ७९४ महिला डब्यांमध्ये ‘इमर्जन्सी टॉकबॅक’ यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या सुविधेमुळे महिला प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत थेट लोकलच्या गार्डशी संपर्क साधता येणार आहे. पश्चिम रेल्वेवर मात्र अद्याप ४५ महिला डबे या सुविधेपासून वंचित आहेत.

आपत्कालीन स्थितीत महिला प्रवाशांना तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रत्येक महिला डब्यात टॉकबॅक बटण बसवण्यात आले आहे. हे बटण लोकलच्या गार्डच्या केबिनमधील यंत्रणेशी जोडलेले आहे. प्रवाशांनी तीन सेकंद बटण दाबून ठेवल्यानंतर गार्डच्या केबिनमधील इमर्जन्सी रिस्पॉन्स युनिटवर सूचना मिळते. त्यानंतर संबंधित प्रवाशाशी थेट संवाद साधणे शक्य होते. प्रवाशांनी कळवलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गाडी पुढील स्थानकावर थांबवायची की, स्थानकांदरम्यान थांबवायची, याचा निर्णय गार्डकडून घेतला जातो.

मध्य रेल्वेच्या लोकलमधील सर्व ७९४ महिला डब्यांत ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या लोकलमधील ४६८ महिला डब्यांपैकी ४२३ डब्यांत ही सुविधा कार्यान्वित आहे. उर्वरित ४५ डब्यांत यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे. महिला डब्यांपाठोपाठ सामान्य डब्यांमध्येही ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. सद्यस्थितीत मध्य रेल्वेवरील ९६ आणि पश्चिम रेल्वेवरील १५० सामान्य डब्यांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *