सीमेवर माओवादी सक्रिय; तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात हायअलर्ट जारी, १६ पथकांकडून कोम्बिंग ऑपरेशन

सरकारने माओवादमुक्तीची घोषणा केली असली, तरी महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणच्या सीमावर्ती भागांत अजूनही काही माओवादी आणि जनमिलिशिया सदस्य सक्रिय असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज, मंगळवारपासून माओवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाच्या जवानांनी तिन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात हायअलर्ट जारी केला आहे.

गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड व तेलंगण सीमेवरील २५हून अधिक पोलिस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. सी-६० कमांडोची १६ पथके अतिसंवेदनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवत आहेत. उच्च क्षमतेच्या ड्रोनद्वारे जंगल परिसरावर नजर ठेवली जाणार आहे. गडचिरोली, छत्तीसगड आणि तेलंगण पोलिसांमध्ये माहितीची देवाण-घेवाण; तसेच संयुक्त शोधमोहीम सुरू राहणार आहे. पुढील आठ दिवस सीमावर्ती भागातील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.

चारू मजूमदारसह पोलिसांच्या कारवाईत ठार झालेल्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी २८ जुलै ते दोन ऑगस्ट या कालावधीत माओवादी शहीद सप्ताह पाळतात. बंदची हाक देतात. हिंसक कारवाया, रास्ता रोको, जाळपोळ, सरकारी व खासगी मालमत्तेची नासधूस, राजकीय व प्रशासकीय पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न करत असतात. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या माओवादमुक्तीच्या घोषणेनंतर हा पहिलाच शहीद सप्ताह आहे. अलीकडेच भामरागड तालुक्यात बंदचे आवाहन करणारे बॅनर आणि पत्रके आढळल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. सीमावर्ती भागांत काही सशस्त्र केडर व माओवादी विचारसरणीशी संबंधित जनमिलिशिया सदस्य अजून सक्रिय असल्याचा सुरक्षा यंत्रणांचा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासनाने व्यापक सुरक्षा आराखडा तयार केला आहे.

दरम्यान, “शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर, आम्ही सतर्क आहोत. सीमेवर विशेष दक्षता घेतली जात आहे. कुठल्याही माओवादी समर्थकांच्या किंवा त्यांच्या विचारधारेला मानणाऱ्यांच्या कारवाया पूर्णपणे रोखण्यासाठी गडचिरोली पोलिस सक्षम आहेत,” असं विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *