संजय गांधीनगर झोपडपट्टीत आग

   संजय गांधीनगर झोपडपट्टीत आग

पिंपरीतील काळेवाडीपुलाच्या शेजारील संजय गांधीनगर झोपडपट्टीला रविवारी (दि. 9) सकाळी सव्वानऊच्या सुमारास आग लागून बारा झोपड्या जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशामकदल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जवळपास अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यास अग्निशामकदलाच्या जवानांना यश आले. या घटनेत दोनजण किरकोळ जखमी झाले आहेत. डॉक्टरांच्या एका पथकाकडून जखमींवर जागेवरच उपचार करण्यात आले.

सकाळी सव्वानऊच्या सुमारास एका झोपडीमधील मीटरला आग लागली. आग लागल्यानंतर काही घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे अल्पावधीतच ही आग संपूर्ण झोपडपट्टीत भडकली. त्यानंतर दक्ष नागरिकांनी इतर झोपडीतील गॅस सिलिंडर बाहेर काढले तर काहींनी नदीपात्रात सिलिंडर फेकून दिले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, यात 12 झोपड्या जळूनccc खाक झाल्या. अग्निशमनदलाच्या पंधरा गाड्यांनी पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आली. अग्निशामकदलाचे 60 जवान आणि 10 अधिकार्‍यांनी ही आग आटोक्यात आणली. रस्त्यांवर नवरात्राचे मंडप असल्याने अग्निशमन गाड्यांना घटनास्थळी जाणे अवघड झाले होते.

संसार उघड्यावर

नवरात्रीचा उत्सव सुरू असल्याने सर्वत्र उत्सहाचे वातावरण आहे. त्यामुळे सर्वत्र देवीच्या पुजेची तयारी सुरू असताना अचानक लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या महिलांमध्ये भितीचे वातावरण होते. घराकडे पाहून अनेक महिलांनी मोठा आक्रोश केला होता, त्यांचे संसार उघड्यावर आल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत होती. आमच्या घरावर पाणी म्हणत रडणार्‍या महिलांची समजूत घालताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *