पिंपरी : सुरक्षा एजन्सीच्या दोन कामगारांनी बनावट पीएफ खाते सुरू करुन त्यावर एजन्सीचे पैसै भरले आणि सुरक्षा एजन्सी मालकांची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार पिंपरीत उघडकीस आला आहे.
मुकेश कुमारसिंग उर्फ शर्मा आणि संजयसिंग (दोघे रा. गया, बिहार) अशी गुन्हे दाखल झालेल्या सुरक्षारक्षकांची नावे आहेत. या प्रकरणी इसाक सत्तार सय्यद (वय 46, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सय्यद यांची सक्सेस एंटरप्रायजेस नावाने सिक्युरिटी एजन्सी आहे. आरोपी मुकेश आणि संजय त्यांच्याकडे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होते. मार्च 2013 ते जून 2016 दरम्यान, आरोपींनी त्यांच्या नावाने बनावट पीएफ खाते काढले. सय्यद यांच्या एजन्सीचे सहा लाख 55 हजार 490 रुपये त्या बनावट पीएफ खात्यामध्ये भरले. या पैशाचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर केला. पिंपरी ठाण्याचे फौजदार श्रीनिवास कामुनी तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इसाक यांची पिंपरीमध्ये सक्सेस एंटरप्रायजेस सिक्युरीटी एजन्सी आहे. या कंपनीत आरोपी काम करत होते. आरोपींनी काम करत असताना कंपनीच्या नावाने बनावट पीपीएफ खाते उघडून कंपनीचे पैसे या खात्यात जमा केले.
