अमेरिकन संत्रा विदर्भात पिकणार

नागपुरी संत्र्यासोबत आता लवकरच अमेरिकन संत्र्यांची चव चाखायला मिळणार आहे. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने अमेरिकन संत्र्याचे दोन नवे वाण विकसित केले आहेत. विशेष म्हणजे ही संत्री तीन महिने झाडावर सुरक्षित राहू शकतात. तसेच यात रसाचे प्रमाणही अधिक राहणार आहे.

फ्लेम ग्रेपफ्रूट व पमोलो यूएस-145 हे दोन्ही वाण लवकरच संत्रा उत्पादकांपर्यंत प्रसारित केले जाणार असल्याचे संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद लदानिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विदर्भासह महाराष्ट्रात नागपुरी संत्रा या वाणाचीच लागवड होते. परंतु, या संत्र्याची टिकवणक्षमता कमी व त्यात बियांचे प्रमाण अधिक असल्याने प्रक्रिया उद्योगात त्याचा कमी वापर होतो. ज्युसकरिता हे वाण फारसे उपयोगी ठरत नाही. बियांच्या प्रमाणामुळे ज्यूस कडवट होतो. यामुळे द्राक्ष, आंब्याप्रमाणे संत्र्यांचेदेखील पर्यायी वाण असावे, अशी मागणी संत्रा उत्पादकांची होती. त्याच पार्श्‍वभूमीवर फ्लेम ग्रेपफ्रूट आणि पमोलो यूएस-145 हे नवे वाण प्रसारित केले जाणार आहेत. फ्लेमग्रेप फ्रूट हे दोन्ही वाण अमेरिकेहून आणले. त्यानंतर गेली सात आठ वर्षे संस्थेने त्यावर संशोधन भारतातील वातावरणात विकसित केले. हे वाण रोग व किडींपासून मुक्‍त असल्याची खात्री केल्यानंतर शूट टिप ग्राफ्टिंग पद्धतीने रोगमुक्‍त कलम बांधून संस्थेच्या परिसरात त्याची लागवड करण्यात आली. यातील फ्लेमग्रेप फ्रूट या संत्रा वाणाची उत्पादकता हेक्‍टरी 25 टन आहे. 6 बाय 6 मीटर असे लागवड अंतर त्याकरिता हवे. त्यातच 4 बाय 4 मीटर असे लागवड अंतर असल्यास हीच उत्पादकता 50 टनापर्यंत पोचविता येते. यात 10 टक्‍के साखरेचे प्रमाण असून बियांची संख्या 1 ते 2 आहे. ज्युसकरिता हे वाण अमेरिकेसह अनेक देशात वापरतात. यातील पोषक घटकांचे अधिक प्रमाण हे एक कारण असल्याचे डॉ. लदानिया यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *