स्वयंपाक घरात बारीक सारीक गोष्टींकडे जरासे लक्ष दिले की बरीच बचतही होते आणि कामही हलके होते.
शिरा करताना त्यामध्ये पायनापल इसेन्स किंवा मँगो इसेन्स घालावे. यामुळे शिर्याला चांगला स्वाद येतो. हवा असल्यास थोडा केशरी रंगही घालावा.
शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा. नंतर नेहमीसारखा शिरा करावा. जास्त चवदार होतो.
पुरण शिजताना हरभर्याच्या डाळीतच चमचाभर तूरडाळ टाकली की, पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो.
पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मूठभर तांदूळ घालावे, म्हणजे पुरण चांगले घट्ट होते.
डोशाचे पीठ भिजत घालताना तांदळाबरोबर मेथीचे चार दाणे भिजत घालावे. डोशाला सोनेरी रंग येतो.
पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा. पोळ्या हलक्या होतात.
मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत.
बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत. तूप कमी लागते. बेसन चटकन् भाजले जाते. डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो.
गोड बुंदी, बर्फीचे तुकडे, लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे.
श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का
फेसावा व साखरेत, साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घालावा व कालवावे.
आंब्याचा रस, श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा. सर्व आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थांत खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते.
मटणाच्या सुक्याबरोबर खायला पोळी करताना त्यामध्ये तांदळाचे पीठ शिजवून पुरणपोळीसारखे भरून करावे.