भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील भाजीपाला व्यापाऱ्यांनी पाकिस्तानला भाज्या, विशेषत: टोमॅटो आणि मिरची निर्यात करणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गुजरातमधील शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे दररोज 3 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून निर्यात बंद करण्यात आली आहे.
गुजतरामधून पाकिस्तानला दररोज 50 ट्रकद्वारे 10 टन भाजीपाला निर्यात करण्यात येतो. त्यामध्ये टोमॅटो आणि मिरचीचे प्रमाण सर्वाधिक असते. मात्र दोन्ही देशांतील तणावाच्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून ही निर्यात बंद करण्यात आल्याची माहिती अहमदाबादमधील जनरल कमिशन एजंट असोसिएशनचे सचिव अहमद पटेल यांनी दिली. “गुजरातमधील भाजीपाला व्यापाऱ्यांनी 1977 नंतर प्रथमच पाकिस्तानला भाजीपाल्याची निर्यात बंद केली आहे. आता जोपर्यंत दोन्ही देशातील संबंध सुधारत नाहीत, तोपर्यंत निर्यात केली जाणार नाही‘, असेही पटेल यांनी सांगितले. दरम्यान बांगलादेश, आखाती देश, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आदी देशांना नियमितपणे भाजीपाल्याची निर्यात सुरूच असल्याचेही ते म्हणाले.