सततच्या दुष्काळाला कंटाळून अनेकांनी शेतीतून काढता पाय घेतला आहे. मात्र या परिस्थितीतही पाटोदा (ता. मंठा) येथील उच्चशिक्षित आदित्य नारायण बोराडे याने खासगी नोकरी सोडून शेतीचा मार्ग निवडला व तो यशस्वीही होत आहे.
28 वर्षीय आदित्य याने पुणे येथून एमबीए आणि बॅंकिंग फायनान्स डिप्लोमा पूर्ण केला. अडीच वर्षे जगविख्यात बियाणे कंपनीत नोकरी केली. नोकरी करून समाधान होत नसल्याने त्याने वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय घेतला.
दीड एकरमध्ये 15 बाय 10 फूट अंतराने सीताफळाच्या चारशे रोपांची लागवड केली. जीवनामृत डोस, गांडूळ खत, शेणखताचा वापर करून बाग फुलवली. फळाच्या आकारानुसार ए, बी, सी अशा ग्रेडनुसार प्रतवारी केली. ए ग्रेडच्या फळाचे वजन सुमारे 350 ग्रॅम किंवा त्यापेक्षा अधिक आहे. एका झाडापासून अंदाजे 10 किलोप्रमाणे पाच टन उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. 40 ते 50 रुपये प्रति किलो भाव मिळाल्यास एक लाख रुपयांचे उत्पन्न निघणार आहे. यातून त्याला 70 हजारांचा निवळ नफा होणार आहे. आणखी दोन एकर सीताफळाची लागवड करणार असल्याचेही आदित्यने सांगितले. सीताफळ बागेला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. झाडाच्या क्षमतेनुसार फळ असावे यासाठी विरळणी तसेच जमिनीत ओलावा, सुपीक करण्यासाठी उसाच्या पाचटाचे आच्छादन केले, रासायनिक खतांचा वापर टाळला. आदित्यने खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली सीताफळाची सेंद्रिय रोपवाटिका तयार केली. गांडूळ खताचा वापर करून पाच हजार रोपांची लागवड केली. रोपवाटिकेतून बोराडे यास चांगले उत्पन्न मिळाले.
सीताफळ बागेत आंतरपीक