सण कोणताही असो, रांगोळ्यांशिवाय पूजा पूर्णत्वाला जात नाही. काळानुसार त्यात विविधता येत आहे. पूर्वी आपल्या आजी, पणजी गोपद्म, रामाची पावले, स्वस्तिकादी शुभ चिन्हांनी अंगण सुशोभित करत होत्या. आई, काकी, मावशी ठिपक्यांच्या रांगोळ्या काढू लागल्या त्यानंतर लाट आली संस्कार भारतीची …
आताच्या मुलींना ठिपके जोडून रांगोळी काढणे कालबाह्य वाटते अन् कठीणही… संस्कार भारती सुंदर दिसते, यात प्रश्नच नाही; परंतु त्याला वेळ खूप लागतो, जागाही मोठी लागते व रंग ही भरपूर… आताच्या सदनिका संस्कृतीत जमणे थोडे अवघडच.. हां! पार्किंगमध्ये सर्वजणी मिळून काढू शकता; पण आपल्या अंगणाचे काय?
फुला-पानांनी जर आपले छोटेसे अंगण सजवू शकला तर रोजच सुशोभित दिसेल. हल्ली मुली मेहंदी काढण्यात प्रवीण आहेत. फुले, पाने तसेच त्या मेहंदीच्या डिझाईन्सचा जर योग्य ताळमेळ बसवला तर नाविन्यपूर्ण रांगोळी दिसेल तुमची. रंगसंगतीचे भान जर रांगोळीत योग्य राखले तर साधीही रांगोळी उठावपूर्ण दिसेल. जसे की कोणतेही दोन मिळते जुळते रंग जवळ घेऊ नये. गडद रंग व फिक्या रंगाचा योग्य समन्वय राखावा. कडेला गडद रंग व मध्ये फिके रंग वापरावेत. फुलांना योग्य रंगात शेडींग करावे. सर्व ठिकाणी पूर्णपणे रंग न भरता रेषा वेगवेगळ्या रंगाने मारून फुले सजवावी. रंग भरल्यावर बॉर्डर आखावी. मी थोड्याशा रांगोळ्या नमुन्यादाखल देत आहे.