अहमदनगर एकाच रात्री तीन ठिकाणी चोर्‍या

शहरालगतच्या कन्हेरओहळ परिसरात पाच चोरटयांच्या टोळक्याने गुरुवारी रात्री 1 ते पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान तीन घरे फोडून सुमारे अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच रोकड लांबविली. पोलिसांत तक्रार द्याल तर चार महिन्यात संपवून टाकू,अशी धमकी चोरटयांनी दिल्याने शुक्रवारी सायंकाळपर्यंत एकही फिर्याद दाखल करण्यात आलेली नव्हती.‘स्कूल चले हम’ असे म्हणत जाताना तिघाही चोरटयांनी पोपट औटी व हिराबाई औटी यांचे दर्शन घेत तुम्ही आमच्या आईवडिलांसमान आहात, असे सांगत निरोप घेतला.

गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पाच चोरटे वरखेडमळा रस्त्यावर दोन दुचाक्यांवर आले. पोपट मारूती औटी यांच्या घराच्या दिशेने चोरटे येऊ लागताच औटी यांच्या वस्तीववरील कुत्री भुंकू लागली. या भागात तरसाचा वावर असल्याने रात्रीच्या वेळी तरस आला की काय हे पाहण्यासाठी पोपट औटी यांनी दार उघडताच पाच पैकी तिघे चोरटे औटी यांच्या घरात घुसले. तर दोघे घराबाहेर उभे राहिले. घराच्या दिशेने कोणी आलेच तर हल्‍ला करण्यासाठी दोघांनी घराबाहेर दगडांचा साठा करून ठेवला होता. घरात घुसल्यानंतर तेथे झोपलेला औटी यांचा नातू अक्षय याला ओलीस ठेवत तुमच्या वारसाला जिवंत ठेवायचे असेल तर जवळ जे काही असेल ते काढून द्या ,असे फर्मान त्यांनी सोडले. घरातील दोन्ही मोबाईलचे सीमकार्ड काढून ते तोडून टाकण्यात आले. त्यानंतर फोनही फोडण्यात आले. औटी यांच्या पत्नी हिराबाई यांच्या डोळयावर विजेरी लावून अंगावरील दागिने काढून देण्याची मागणी एकाने केली. हिराबाई यांनी आढेवेढे घेताच दुसर्‍याने त्यांच्या दिशेने हातातील पहार मारण्याचा प्रयत्न केला. त्यात हिराबाई यांच्या डोळयास किरकोळ जखम झाली. त्यानंतर मात्र हिराबाई यांनी गळा, कान तसेच नाकातील दागिणे काढून दिले. पायातील जोडवेही चोरटयांनी काढून घेतले. सोन्याचे दागिणे हस्तगत केल्यानंतर चोरटयांनी घरातील प्रत्येक वस्तूची उचकापाचक करून जे काही मिळेल ते हस्तगत केले.

म्हैस खरेदीसाठी औटी यांनी 70 हजार रूपयांचे रक्‍कम जमविली होती. ही रक्‍कम वेगवेगळया ठिकाणी ठेउनही संपूर्ण रक्‍कम चोरटयांच्या हाती लागली. नातू अक्षय याने खाऊच्या पैशातून साठविलेले 3 हजार 500 रूपये बचत बँकेत ठेवले होते. ती बचत बँकही फोडून त्यातील रक्‍कम चोरटयांनी ताब्यात घेतली. अक्षय याच्या दप्तरातील वहया पुस्तके फेकून देत हस्तगत केलेला ऐवज दप्तरात भरण्यात आला. ‘स्कूल चले हम’ असे म्हणत जाताना तिघाही चोरटयांनी पोपट औटी व हिराबाई औटी यांचे दर्शन घेत तुम्ही आमच्या आईवडिलांसमान आहात असे सांगत त्यांनी निरोप घेतला. आम्ही तुमच्या घराच्या कडया लाऊन जात आहोत, आरडाओरडा करू नका, पोलिसांना कळवू नका, कोणास सांगितले तर परत आल्यावर तुमचा खातमा करू अशी धमकीही देण्यात आली. सुमारे पाऊण तास चोरटे औटी यांच्या घरात होते.  आणखी तीन ते चार घरे फोडून परत येत असल्याचेही चोरटे औटी यांना बजावून गेले.

औटी यांच्या घराचा सफाया केल्यानंतर दोन्ही दुचाक्या वरखेड रस्त्यावरच ठेऊन चोरटयांनी पहाटे सव्वादोनच्या सुमारास सुपे रस्त्यावरील रामभाउ हांडे यांचे घर गाठले. तेथे एका खोलीत गोरक्ष हांडे, गणेश औटी व प्रियांका हांडे हे झोपलेले होते. त्या खोलीच्या दारावर लाथा मारून दार उघडण्यासाठी त्यांनी दरडावले. आतून हांडे व औटी हे आरडा ओरडा करू लागताच एकाने घराबाहेर लावण्यात आलेेले दोन्ही बल्ब फोडून टाकले. चोरटे दारावर जोराने लाथा मारून ते उघडण्याचा प्रयत्न करीत असताना गोरक्ष हांडे व गणेश औटी यांनी आतून दार दाबून धरल्याने चोरटयांचा इलाज चालला नाही. त्या खोलीस बाहेरून कडी लावून चोरटयांनी शेजारील खोलीकडे मार्चा वळविला. पहारीच्या मदतीने त्या खोलीची आतील कडी तोडून त्यांनी घरात प्रवेश केला. तेथे झोपलेल्या 85 वर्षीय सुगंधाबाई सीताराम हांडे यांना मारहाण करीत त्यांच्या अंगावरील सुमारे दोन तोळयांचे दागिने चोरटयांनी हस्तगत केले. त्याच वेळी शेजारच्या वस्तीवर कोणीतरी आल्याचे लक्षात आल्यानंतर चोरटयांनी त्या खोलीतील कुलपबंद पेटी ताब्यात घेऊन तेथून पळ काढला. बाजूच्या ओढयाजवळ पेटीचे कूलूप तोडून त्यातील वीस हजार रूपयांची रोकड ताब्यात घेऊन पेटी तसेच त्यातील कपडे तेथेच टाकून देण्यात आले.

त्यांनतर कन्हेरओहळ पुलाजवळील राजेंद्र व भिसे यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीचे दार तोडून घरात प्रवेश केला. घरातील सुमारे आठ हजार रूपये तसेच पेटीत दडवून ठेवलेले दोन तोळयांचे दागिणे घेऊन चोरटे पसार झाले. हांडे कुटुंबीयांच्या तिन्ही खोल्यात तीन सदस्य झोपले होते. ज्या घरात चोरी करण्यात आली, तेथे राजेंद्र भिसे यांची आई झोपलेली होती. चोरटे पसार झाल्यानंतर घरात चोरी झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *