अल्बिनो म्हणजे सफेद पशुपक्षी ही काही नवलाईची बाब नाही. पक्ष्यांमध्येही अगदी मोरासारखा रंगीबेरंगी पक्षीही सफेद स्थितीत पाहायला मिळू शकतो. मात्र, या नेहमीच्या ‘अल्बिनो’ स्थितीपेक्षा काही वेगळी स्थिती असलेल्या एका पक्ष्याचा ऑस्ट्रेलियात शोध घेण्यात आला आहे. पर्थजवळ आढळलेला हा पक्षी ‘ल्युसिझम’ या अत्यंत दुर्मीळ विकाराने ग्रस्त आहे. त्यामुळे त्याच्या त्वचेतील रंगद्रव्ये अंशतः नष्ट झाली आहेत.
संशोधकांच्या मते हा शोध ‘वन्स इन ए लाईफटाईम’ अशा थाटाचा आहे. हा सफेद विली वॉगटेल पक्षी पाहिल्यावर स्थानिक लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. (आपल्याला पांढरा कावळा पाहिल्यावर जसा धक्का बसेल तसा!) संशोधकांनी सांगितले की, निसर्गात असे काही पक्षी असू शकतात, पण ते मानवी नजरेत क्वचितच येतात. या पक्ष्यांना त्यांच्या प्रजातीमध्येही मिसळून घेतले जात नाही. त्यांना प्रजननासाठी जोडीदार मिळणेही कठीण जात असते. अशा अनेक पक्ष्यांचे आयुष्यही तुलनेने कमीच असते.