शहरातील सुमारे 70 हजार विडी कामगारांना दसर्यानिमित्त सुमारे 10 ते 12 कोटी रुपयांच्या बोनसचे वाटप करण्यात आले. यानिमित्त पूर्व भागातील अनेक कारखान्यांजवळ बाजार भरल्याचे चित्र दिसत आहे.
सर्वसाधारणपणे कर्मचारी, कामगारांना दिवाळीनिमित्त बोनस वाटला जातो, पण विडी उद्योग याला अपवाद आहे. या उद्योगात दसर्यानिमित्त बोनस दिला जातो. कामगारवर्गात दसरा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे विडी कामगारांना दिवाळीऐवजी दसरानिमित्त बोनसचे वाटप केले जाते. गेल्या काही दिवसांपासून शहरातील 14 विडी कारखानदारांकडून बोनसचे वाटप सुरू आहे. यामध्ये साबळे-वाघीरे कंपनी, देसाई विडी, ठाकूर-सावदेकर विडी, लंगर विडी, बत्तीन विडी, व्ही.एस. ठाकूर विडी, चंद्रतारा विडी, सोहेल विडी, बालाजी विडी आदी कंपन्यांचा समावेश आहे. बोनस वाटप असल्याने अनेक व्यापार्यांनी कारखान्यांजवळ संसारोपयोगी वस्तूंचा बाजार थाटला आहे. त्यामुळे बोनस हाती पडलेल्या कामगारांची येथे खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसत आहे. अक्कलकोट रोडवरील सादूल पेट्रोल पंपाजवळील देसाई कारखाना हा महामार्गालगत असल्याने बाजारामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यामुळे येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विडी उद्योगात सुमारे 70 हजार कामगार असून दररोज चार कोटी विड्यांचे उत्पादन होते. या कामगारांना वार्षिक मजुरीच्या 8.33 टक्के इतका बोनस दिला जातो. याचा विचार करता 70 हजार कामगारांच्या बोनसचा आकडा 10 ते 12 कोटींपर्यंत जातो, अशी माहिती साबळे-वाघीरे विडी कंपनीचे सरव्यवस्थापक बाळासाहेब जगदाळे यांनी दिली.