प्रत्येक आकाशगंगेच्या मध्यभागी एक कृष्णविवर असते. एखादा तारा मृत झाला की त्याचे रूपांतर प्रचंड आकर्षणशक्ती असलेल्या अशा पोकळीत होत असते. या कृष्णविवरांबाबत सातत्याने वेगवेगळे संशोधन केले जाते. आता ‘नासा’च्या चंद्रा एक्स-रे वेधशाळेने तसेच युरोपियन स्पेस एजन्सीच्या एक्सएमएम-न्यूटन एक्स-रे वेधशाळेने एका अनोख्या कृष्णविवराचा शोध लावला आहे. हे कृष्णविवर एकाच जागी स्थिर नसून ते भटकत आहे हे विशेष.
एका छोट्या आकाशगंगेमध्ये हे शक्तिशाली कृष्णविवर आहे. ते मातृ आकाशगंगेच्या मध्यभागी नसून त्याच्या बाजूला आहे. अनेक आकाशगंगांमध्ये शक्तिशाली कृष्णविवरे आहेत. त्यांचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या वस्तुमानापेक्षा एक लाख ते दहा अब्ज पटीने अधिक असू शकते. अशीच शक्तिशाली कृष्णविवरे बहुतांश आकाशगंगांच्या केंद्रस्थानी आहेत. मात्र, हे कृष्णविवर मध्यम शक्तीचे आहे. त्याचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानापेक्षा शंभर ते एक लाख पटीने अधिक असू शकते. पृथ्वीपासून 4.5 अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर असलेल्या आकाशगंगेत हे कृष्णविवर आहे.