उपराजधानीतील १६वर्षीय अल्पवयीन मुलीला ‘डिजिटल अरेस्ट’ ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी निर्भय ऊर्फ आकाश माधव पाखरे (वय २०, रा. घोडबंदर रोड, हिरानंदानी इस्टेट, पाटीलपाडा, ठाणे) याने परराज्यातील आणखी एका अल्पवयीन विद्यार्थिनीलाही अशाच पद्धतीने डिजिटल अरेस्ट ठेवले होते. या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी सखोल तपास करून निर्भयविरुद्ध सुमारे ५०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी बारावीत शिकणारी पीडित विद्यार्थिनी समाजमाध्यमाद्वारे ‘आकाश मेहरा’ या नावाच्या आयडीशी संपर्कात आली. हा आयडी निर्भय पाखरे याचाच असल्याचे तपासात समोर आले. त्याने ओळख वाढवून मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. याच काळात त्याने पीडितेच्या तीन मैत्रिणींशीही संपर्क साधला होता. मात्र, त्याच्या वागणुकीमुळे आणि दबावामुळे त्या मुलींनी त्याच्याशी संपर्क तोडला.
दरम्यान, निर्भयने पीडित मुलीला आक्षेपार्ह छायाचित्रे व चित्रफीत पाठविण्यास भाग पाडले. त्याच आधारे तो तिला ब्लॅकमेल करू लागला. ऑगस्ट महिन्यात फ्रेण्डशिप डेच्या सुमारास निर्भय विमानाने नागपुरात आला. त्याने दिघोरीतील स्नेहनगर येथे खोली भाड्याने घेतली आणि पीडित मुलीला तेथे बोलावले. तेथे तिच्यावर अत्याचार करून त्याने घटनेची चित्रफीत तयार केल्याचा आरोप आहे. मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या वडिलांनी हुडकेश्वर पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मध्यरात्री मुलीची सुटका केली आणि निर्भयला अटक केली.
तपासादरम्यान पोलिसांनी निर्भयचा मोबाइल आणि लॅपटॉप जप्त केले. न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यातून नागपूरमधील पीडित मुलीप्रमाणेच परराज्यातील एका अल्पवयीन मुलीलाही त्याने जाळ्यात ओढल्याचे समोर आले. तिची आक्षेपार्ह छायाचित्रे मिळवून तो तिलाही ब्लॅकमेल करीत होता.
