कोपर्डी घटनेप्रकरणी संशयितांवर आरोपपत्र दाखल करण्यास पोलिसांकडून विलंब होत असल्याचा आरोप करत येत्या दोन दिवसांत आरोपपत्र दाखल न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
दि. १७ जुलै रोजी अहमदनगरमधील कोपर्डी परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर कर्जत येथे बलात्कार करून तिची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. तीन महिने होत आले तरीही या प्रकरणी संशयितांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही. पोलिसांकडून हा विलंब होत असल्यानेच नागरिक आंदोलन करत आहेत. तीन महिन्यांत आरोपपत्र दाखल न झाल्यास संशयितांना जामीन मिळतो. मुख्यमंत्र्यांनी एक महिन्यात आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. पण पुढे काहीच झाले नाही असे सांगत येत्या दोन ते तीन दिवसांत संबंधितांवर आरोपपत्र दाखल न झाल्यास दि. ११ पासून राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवती व राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा खासदार सुळे त्यांनी नाशिक येथे झालेल्या एका कार्यक्रमात दिला.