गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करण्यासाठी भारतात स्थापन करण्यात येणार्या द लेसर इंटरफेरॉमीटर ग्रॅव्हिएशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी (लिगो) लॅबसाठी हिंगोली जिल्ह्यातील औंधची निवड होण्याची दाट शक्यता आहे. सदर जागेची पाहणी करण्यात आली असून केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळानेही या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे. सध्या अशी लॅब फक्त अमेरिकेत असून त्यानंतर ती हिंगोलीत होणार असल्याने महाराष्ट्राकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे.
द लेसर इंटरफेरॉमीटर ग्रॅव्हिएशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी (लिगो) या नावानेच हा प्रकल्प ओळखला जात असून हा प्रकल्प हिंगोली जिल्ह्यात कार्यान्वित झाला तर हिंगोलीचे नाव जागतिक नकाशावर येणार आहे. सध्यातरी हा प्रकल्प हिंगोलीतील औंध येथे होईल, असे गृहीत धरूनच कामकाजाला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये प्राथमिक कामासाठी नेमण्यात येणार्या कमिटीचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत गुरुत्वाकर्षण लहरींच्या होणार्या प्रयोगासाठी दोन्ही बाजूला 150 मीटर रुंदीचा किमान चार किलोमीटरचा एकसंध ट्टा हवा. तसेच ही जागा सपाट हवी. अन हिंगोलीतील औंधची जागा या वर्गवारीत बसत असल्याचे अॅटोमिक एनर्जी विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांच्याकडून या जागेची शिफारसही करण्यात आली आहे. लिगो प्रकल्पासाठी या जागेची पुन्हा एकदा पाहणी करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. अणुऊर्जा खात्याच्या अधिकार्यांनी या जागेला भेट दिली असली तरी अजून या जागेबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.
लिगो लॅब महाराष्ट्रात साकारल्यास अमेरिकेशिवाय अशी प्रयोगशाळा उभारणारा भारत हा पहिलाच देश ठरेल आणि त्यातही महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य असेल. सध्या अशी लॅब फक्त अमेरिकेत आहे. अर्थात तिचा उल्लेख एक लॅब केला जात असला तरी संपूर्ण अमेरिकेत ही लॅब चार ठिकाणी वॉशिंग्टन (लिगो हँनफोर्ड) आणि लुईसियाना (लिगो लिव्हिंगटन) अशा दोन ग्रेव्हिटेशनल वेव्ह डिटेक्टर्समध्ये विभागलेली आहे. या दोन्ही जागा तुलनेने एकाकी असून त्यातही हॅनफोर्ड तर अक्षरश: वाळवंटी प्रदेश आहे. त्यामुळेच तब्बल चार किलोमीटरपर्यंतचा पट्टा या लॅबसाठी तिथे सहज मिळू शकला. जिज्ञासू विद्यार्थी या लॅबची माहिती www.ligo.caltech.edu या संकेतस्थळावर जावून घेऊ शकतात.