किशोरवयीन मुलीची बना मैत्रीण

तुमची मुलगी मोठी होत आहे आणि तुमच्यापासून थोडी वेगळी राहते आहे. पूर्वीसारखी ती तुम्हाला सगळ्या गोष्टी येऊन सांगत नाही. स्वत:तच मग्न असते, ती डायरी लिहिते, मित्र-मैत्रिणींबरोबर जास्त वेळ घालवते, कधी कधी तर चिंता वाटावी एवढा. कधी कधी त्यासाठी ती खोटेही बोलते. अशावेळी तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी वाटू लागते. मग तुम्ही तिला रागावता, धाक दाखवता, तिच्यावर बंधने घालू पाहता. तिला शिस्त लावू पाहता; पण त्याचा परिणाम उलटाच होतो. ती आणखी बंडखोरपणाने वागू लागते आणि तुमचे ब्लडप्रेशर वाढू लागते. या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा, हे सूचत नाही आणि मग एकदा मुलीचे लग्न झाले की, आपण सुटलो, असे वाटू लागते. खरं तर हा सगळा दृष्टिकोनच चुकीचा आहे. किशोरवयीन मुलींच्याबाबतीत त्यांच्या पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. या मुलींना धाकात ठेवून, त्यांच्यावर अनेक निर्बंध घालण्यापेक्षा तुम्ही त्यांची मैत्रीण झालात आणि त्यांच्याबारेबर
विश्‍वासाचे नाते निर्माण केलेत तर लपवाछपवीचे काही कारणच उरणार नाही.
मात्र, त्यासाठी तुम्हालाही काही नियम
पाळावे लागतील. तुम्हाला तुमची मुलगी कितीही साधी, निरागस, छक्केपंजे न समजणारी असे वाटत असली तरी तिच्या मित्र-मैत्रिणीत वावरताना तिला येणार्‍या समस्या, अडचणीतून मार्ग काढण्यासाठी तिचे तिला निर्णय घेऊ दे. त्याचबरोबर तिने वागायचे कसे, मेकअप करायचा की नाही, गाणी ऐकायची की नाही, फोनवर बोलायचे की नाही, रात्री जागून अभ्यास करायचा की पहाटे उठवून अशा गोष्टी तिच्या तिला ठरवू देत. त्यात तुम्ही फारसे लक्ष घालू नका. फक्त काही चुकत असेल तर निदर्शनास आणून द्या; पण प्रत्येक गोष्ट तिच्यावर लादू नका. तिच्या मताने तिला वागू दिलेत तर पुढील आयुष्यात ती निर्णयक्षम बनेल.
दुसरी गोष्ट म्हणजे तुमची मुलगी किशोरवयात आली की, ती मोठी झाली आणि आता तिच्या जेवण्याखाण्याची आणि गरजा पूर्ण करण्याचीच केवळ तुमची जबाबदारी आहे, असे समजू नका. त्यापलीकडे जाऊन तिची मैत्रीण बना. या वयात होणार्‍या चुकांपासून तिचा बचाव करण्यासाठी तिची मदत करण्यासाठी हे आवश्यक आहे. म्हणूनच तिच्यावर नुसतीच टीका करत राहण्यापेक्षा तिचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा. तिच्याशी तुम्ही भलेही सहमत नसाल; पण तरीही तिला तिचे म्हणणे न घाबरता सांगण्याची संधी द्यायलाच हवी. तुम्हाला तिचे म्हणणे योग्य वाटत नसेल तर ते तिला व्यवस्थितपणे समजावून सांगा, कुठेही रागवण्याचा आविर्भाव न दाखवता. तुमची मुलगी चुकलीच तर तुम्हाला राग येणे स्वाभाविक आहे; पण तिला रागावतानाही तिने केलेल्या चुकीतून तिला सावरण्याचाच तुमचा हेतू असायला हवा. त्याचबरोबर अशी चूक पुन्हा होणार नाही, यासाठी तिला तयार करण्याची जबाबदारी तुमची आहे.
पण याहीपेक्षा तिच्याकडून चूक घडणारच नाही, यासाठी तिला मदत करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. तिला कसलीही भीती न वाटता तिने प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करायला हवी, असे नाते तिच्याशी निर्माण करा. तुमच्यात तो मोकळेपणा नसेल तर तुमची मुलगी तुमच्याशी मोकळेपणाने बोलणार नाही, आणि तिची समस्या तुम्हाला सांगणार नाही.  थोडक्यात, मुलीची मैत्रीण बनून तिच्याशी मोकळेपणाचे नाते ठेवा. जेणेकरून तिला तुमच्याशी कोणतीही लपवाछपवी करावी लागणार नाही, आणि तुम्हालाही तिच्या वागण्याविषयी विश्‍वास निर्माण होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *