वनविभागाने अलिकडेच केलेल्या सर्वेक्षणात कृष्णा नदीत हरिपूरपासून आमणापूर (ता. पलूस) पर्यंत 23 किलोमीटर पट्ट्यात 19 मोठ्या मगरींसह 36 पिलांचे वास्तव्य आढळून आले. प्रत्यक्षात मात्र मगरींची संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भातील सविस्तर अहवाल वनविभागाने राज्य शासनाला सादर केला आहे. कृष्णा नदीतील मगरींचे अस्तित्व वर्षागणिक वाढत असून कृष्णाकाठाला मगरमिठी आवळली जातेय, यावर ठोस उपाययोजना करण्याच्या हालचालीही सुरु आहेत.
का वाढत आहेत मगरी?
जानेवारी ते मे हा मगरींचा प्रजनन काळ असतो. एक मगर साधारणपणे 40 अंडी घालते. मे महिन्यात पिले जन्माला येतात. या काळात अंड्यांची व पिलांची सुरक्षा करण्यासाठी ती आक्रमक असते. तिच्या अधिवास क्षेत्रात माणूस आणि जनावरांचा वावर आल्यास ती त्यांच्यावर थेट हल्ला चढवते. तिच्या अधिवासाच्या परिसरात या काळापुरती सुरक्षेच्या उपाययोजनेबाबत अभ्यास करण्यात येत आहे. मगरींचा अधिवास सुरक्षित ठेवून कृष्णाकाठावरील भीतीची छाया कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे विभागीय वनअधिकारी समाधान चव्हाण यांनी “सकाळ‘शी बोलताना सांगितले.
इथे आहेत मगरी…
- हरिपूर ते सांगली – 3 मोठ्या
- मौजे डिग्रज, कसबे डिग्रज – 2 मोठ्या, 5 पिले
- ब्रह्मनाळ – 2 मोठ्या, 10 पिले
- चोपडेवाडी, सुखवाडी – 4 मोठ्या
- भिलवडी – 6 मोठ्या
- औदुंबर – 1 मोठी, 14 पिले
- आमणापूर – 1 मोठी, 5 पिले

