रुग्णालयातून आईचा मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी शववाहिनी उपलब्ध नसल्याने आदिवासी महिलेच्या मुलाला व नातेवाईकांना ट्रॉली रिक्षावरुन तिचा मृतदेह घरी घेऊन जावा लागला. रुग्णालयाने गाडी नाकारल्याने दाना माझही या आदिवासी व्यक्तीला पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन १२ किलोमीटर चालावे लागल्याच्या घटनेला अजून महिनाही उलटलेला नसताना ओदिशामध्ये अशाच प्रकारची आणखी एक घटना समोर आली आहे.
पाना तिरीका (६५) या आदिवासी महिलेचे शनिवारी जजपूर जिल्हा रुग्णालयात निधन झाले. पोटदुखीच्या त्रासामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी या महिलेचे निधन झाले. मागच्या महिन्यापासून राज्य सरकारने रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी महाप्रयाण नावाने शववाहिनीची सेवा सुरु केली आहे. पण शनिवारी जजपूर जिल्हा रुग्णालयात एकही शववाहिनी उपलब्ध नव्हती.
रुग्णालयापासून ४ किमी अंतरावर अंकुला या ठिकाणी महिलेचा मृतदेह घेऊन जायचा होता. पण खासगी रुग्णवाहिकेची सेवा चालवणा-यांनी या कुटुंबाकडे अव्वाच्या सव्वा रक्कम मागितली. या गरीब कुटुंबाला ही रक्कम परवडणारी नसल्याने अखेर त्यांनी ट्रॉली रिक्षावरुन मृतदेह घरी घेऊन जाण्याचा पर्याय निवडला.