सीमेपलीकडून होणा-या कोणत्याही दहशतवादी हल्ल्यास ‘जशास तसे’ चोख प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कर सज्ज आहे. या प्रत्युत्तराची जागा आणि वेळ आम्ही ठरवू, अशी आक्रमक भूमिका लष्कराच्या ऑपरेशन्स विभागाचे महासंचालक रणबीर सिंग यांनी जाहीर केली आहे.
उरी हल्ल्यानंतर राजकीय पातळीवर विविध चर्चा सुरू असतानाच लष्कराने आपल्या पातळीवर ठोस भूमिका घेतली आहे. राजकीय नेते व सुरक्षा तज्ज्ञांनी पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी तळांवर हल्ले करण्याबाबत चर्चा सुरू केल्यानंतर लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी हे वक्तव्य केले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा व अंतर्गत भागात दहशतवादी कारवाया भारतीय लष्कराने मोडून काढल्या आहेत. त्यामुळे या हल्ल्यालाही चोख प्रत्युत्तर देऊ. त्याची जागा व वेळ आम्ही ठरवू, असे त्यांनी स्पष्ट केले.
येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी सांगितले की, आमच्यावर केलेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत. यंदा आतापर्यंत विविध चकमकीत ११० दहशतवाद्यांना आम्ही यमसदनास धाडले आहे. त्यापैकी ३१ दहशतवादी हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडताना ठार झाले. यंदा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचे १७ प्रयत्न झाले. मात्र, लष्कराने ते यशस्वीपणे मोडून काढले, अशी माहिती त्यांनी दिली.
उरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्र, अन्नधान्याचा व औषधांचा मोठा साठा जप्त केला. या सर्व पदार्थावर पाकिस्तानच्या खुणा आहेत. या दहशतवाद्यांकडे ३९ बॅरेल ग्रेनेड लाँचर, ५ हातबॉम्ब, २ रेडियो सेट, २ ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, २ नकाशा यंत्रणा सापडली. दरम्यान, लष्कराच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. मात्र त्याचे ठिकाण व वेळ आताच उघड करणे योग्य ठरणार नाही. भारतीय लष्कराकडे रणनीती तयार असून ती तडीस नेण्यास आम्ही सक्षम आहोत.
मोदी म्हणतात, जगात पाकिस्तानला अलग पाडण्याचे युद्ध खेळू
उरी हल्ल्यानंतर भारताने राजनैतिक पातळीवर जगात पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पाकिस्तान हा दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचे ठोस पुरावे जगासमोर आक्रमकपणे मांडण्याचे भारताने ठरवले आहे.
उरी हल्ल्यानंतर देशात संताप उसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंग, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, अर्थमंत्री अरुण जेटली, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
या हल्ल्यानंतर पाकिस्तानला चांगला धडा शिकवण्यासाठी विविध पातळय़ांवर मोहीम हाती घेण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात येणार आहे. विशेषत: संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया जगासमोर ठोसपणे मांडण्याचे भारताने ठरवले आहे.
या हल्ल्यातील चार दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या खुणा असलेली शस्त्रास्त्रे, अन्नधान्ये, एनर्जी देणारी पेये, जीपीएस ट्रॅकर वापरली. याचे पुरावे भारत पाकिस्तानला देणार आहे. या दहशतवाद्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतात घुसखोरी केली.
उरी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे पुरावे भारतीय लष्कर पाकिस्तानला सोपवणार आहे.