पोटात कावळे कोकलू लागले तर तुम्ही पटकन मॅगीचे पॅकेट फोडता आणि फक्त २ मिनिटांत चमचमीत मॅगी बनवून ताव मारता… पण आता सावधान… रसरशीत चटपटीत मॅगीत चक्क शिसे आणि ‘एमएसजी’ हे शरीरासाठी घातक असणारे पदार्थ असल्याचं उघड झालंय… त्यामुळे मॅगीचा परवानाच रद्द करण्याची शिफारस केंद्रीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडे करण्यात आलीय.
‘मम्मी भूक लागलीय… दोन मिनिट…’ अशा जाहिरातीने घराघरात पोहोचलेल्या आणि बच्चे कंपनीपासून आजोबांपर्यंत सार्यांच्याच तोंडाला पाणी आणणार्या मॅगीचे नमुने उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी तपासण्यात आले तेव्हा त्यात मोनोसोडियम ग्लुटामेट (एनएसजी) आणि शिशाचे प्रमाण बेसुमार असल्याचे आढळले. हे दोन्ही पदार्थ प्रकृतीसाठी अत्यंत घातक असून हे पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त पोटात गेले तर त्याचे भयंकर दुष्पपरिणाम शरीरात होऊ शकतात. याची गंभीर दखल घेऊन लखनौच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ही माहिती केंद्रीय अन्न सुरक्षा आणि मानव प्राधिकरणाला कळविली असून मॅगीचा परवाना रद्द करून देशात मॅगी विक्रीवर बंदी आणावी, अशी शिफारस त्यांनी केली आहे.
चाचण्या घेऊन ठरणार भवितव्य
केंद्रीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडून ‘मॅगी’च्या विविध चाचण्या होतील. मॅगीमध्ये कोणते घटक आहेत हे तपासले जाईल. त्यानंतर कारवाईबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ‘मॅगी’ उत्पादन करणार्या नेस्ले कंपनीने आरोप फेटाळले आहेत. मोनोसोडियम ग्लुटामेटचा वापर करीतच नाही आणि शिशाचेही प्रमाण कमीच आहे, असा दावा केला आहे.
२ मिनिटांची मॅगी शरीराला घातक! बंदीची मागणी
