शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांची शाळा भरली

विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा एकाच दिवशी म्हणजे १५ जून रोजी सुरू करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आदेश असताना अनेक शाळांनी शिक्षकांना मंगळवारपासूनच शाळेत बोलावल्याने शिक्षकांत संताप व्यक्त होत आहे. शाळेत मुले नसताना शिक्षकांना शाळेत बोलावणा-या शाळांवर कारवाई करण्याची मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.

या संदर्भात आमदार रामनाथ मोते यांनी शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांच्याकडे तक्रार केली असून विनाकारण शिक्षकांना बोलावणा-या शाळांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राज्यात एकाच दिवशी शाळा सुरू होण्यासाठी राज्याच्या शिक्षण संचालनालयाने १ एप्रिल २०१५ रोजी राज्यातील सर्व शिक्षणाधिका-यांना सूचना देऊन शाळा १५ जून रोजी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

विदर्भात मात्र उन्हाळा असल्याने २६ जून रोजी शाळा सुरू कराव्यात, अशा सूचना आहेत. या आदेशाला केराची टोपली दाखवत मुले नसताना अनेक शाळांच्या संस्थाचालकांनी शिक्षकांना शाळेत बोलावले आहे. शाळेत मुलेच नसतील तर शिकवायचे कुणाला? असा प्रश्नही शिक्षकांना पडला आहे.

शाळा सुरू होण्यापूर्वी एकसूत्रता राहावी यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र शाळा प्रमुख व संस्थाचालक शिक्षण विभागाचे आदेश धाब्यावर बसवून मनमानी करत असल्याने अशा शाळांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *