मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोरजवळ गुरुवारी रात्री लक्झरी बस आणि टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. यात दोनजण जागीच ठार झाले. तर अन्य १८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यव्यस्त आहे. अपघातानंतर लक्झरीचा चालक आणि क्लिनर फरार झाले आहेत.
गुरुवारी रात्री पडलेल्या पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
पुण्याहून मुंबईमार्गे उदयपूरला जाणा-या या बसमध्ये २३ प्रवासी होते. मनोरपासून पाच किलोमीटरवर असताना या लक्झरी बसने एका टेम्पोला जोरदार धडक देत ही बस रस्त्याकडेच्या ३० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पालघरचे तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी घटनास्थळी जाऊन मदत व बचावकार्याची पाहणी केली. अपघातानंतर बसचा चालक आणि क्लिनर दोघेही फरार झाले आहेत. त्यांचा मनोर पोलीस कसून शोध घेत आहेत.

