मुंबईच्या समुद्र किना-यावर लाट सलग तिस-या दिवशीही पावसाने मुंबईला झोडपून काढले. सकाळपासूनच रिमझिम पडणा-या पावसाने दुपारनंतर जोरदार बरसात करत मुंबईकरांना सुखावून सोडले. या संततधार बरसणा-या पावसामुळे मुंबईकरांनीही दुपारी झणझणीत चिकन मटणाचा फक्कड बेत आखत सुट्टी एन्जॉय केली.
मुंबईत शनिवार ते रविवार सकाळी आठवाजेपर्यंत मुंबई शहरात आणि उपनगरात ६५ ते ७० मि.मी एवढा पाऊस कोसळला होता. परंतु त्यानंतर सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शहरात २६ मि.मी. पश्चिम उपनगरात १३ मि.मी आणि पूर्व उपनगरात १५ मि.मी एवढया पावसाची नोंद झाली होती.
शहरातील परेल, एलफिन्स्टन, लालबाग, भायखळा आदी भागांमध्ये दुपारनंतर मुसळधार पाऊस कोसळला. मात्र, संध्याकाळी चारनंतर सव्वा चार मीटर उंचीची भरती असल्यामुळे तसेच याच कालावधीत मुसळधार पाऊस पडू लागल्यामुळे काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
परंतु संध्याकाळी पाच नंतर पावसाने थोडी विश्रांती घेत रिमझिम सुरुच ठेवली होती. मात्र, पावसाच्या संततधारेमुळे तापमानात बदल होऊन हवेत गारवा पसरला होता. त्यामुळे मुंबईकर चांगलेच सुखावले होते.
पावसामुळे वातावरणात निर्माण झालेला गारवा यामुळे प्रत्येक ठिकाणी चहाच्या टपरी आणि गरमा गरम भजीच्या स्टॉल्सवर गर्दी दिसून येत होती.
मोठया लाटांची भरती आणि पाऊस यामुळे संध्याकाळी वरळी,मरीन डाईव्ह, शिवाजीपार्कसह अनेक चौपाटय़ांवर कॉलेज तरुण तरुणींसह अनेक पर्यटक हजेरी लावत भिजण्याचा आनंद लुटताना दिसत होते.
शहर आणि उपनगरात येत्या २४ तासांमध्ये काही ठिकाणी जोरदार तसेच एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे.
शनिवारी रात्रीपर्यंत शहर आणि उपनगरांत एकूण ७८ झाडे उन्मळून पडणे तसेच त्यांच्या फांद्या तुटून पडण्याचे प्रकार घडले होते. मात्र संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शहर आणि उपनगरांमध्ये २५ झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या होत्या.
