खेड तालुक्यात गेल्या ४८ तासांत २०० मि.मी. पावसाची नोंद झाली असून; नातूनगर येथील मोरेवाडी येथील डोंगर खचू लागल्याने सात घरांना धोका निर्माण झाला आहे.
तालुक्यात झालेल्या पावसाचा लोटे औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यासह ४३ घरांना व एका मंदिराला फटका बसला आहे. त्यामुळे ४ जूनपासून पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा २ लाख ७२ हजार ७५० रुपयांवर पोहोचला आहे.
गेल्या चार दिवसांत संततधार पावसामुळे शनिवारी पहाटे डोंगरावर वसलेल्या नातूनगर मोरेवाडीतील पुनर्वसन गावठाणात दरड कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी दगड-माती रहिवाशांच्या घरापर्यंत पोहोचल्याने घबराट पसरली आहे.
या परिसरातील डोंगरदेखील खचत असून सात घरांना धोका निर्माण झाला आहे. २० वर्षापूर्वी नातूनगर धरण प्रकल्पग्रस्तांचे मोरेवाडी येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. आठ ते दहा वर्षाच्या या काळात चार ते पाच वेळा भूस्खलन झाले आहे.
