पाकिस्तानला म्यानमार समजू नका, पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांचा इशारा

पाकिस्तानला म्यानमार समजू नका, पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांचा इशारा

भारतीय लष्कराच्या जवानांनी म्यानमारमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या केलेल्या खात्म्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. ‘भारतानं पाकिस्तानला म्यानमार समजू नये,’ असा इशारा पाकिस्ताननं दिला आहे.

‘भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये दहशतवाद्यांविरोधात केलेली कारवाई ही इतर देशांना एक इशारा आहे’ असे राठोड यांनी म्हटलं होतं. त्यांचं हे वक्तव्य पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली खान आणि लष्करप्रमुख राहील शरीफ यांना चांगलंच झोंबलं. त्यांनी तत्काळ राठोड यांना प्रत्युत्तर दिलं. ‘पाकिस्तान हे काही म्यानमार नव्हे. सीमेपलीकडून आलेल्या कुठल्याही धमकीला घाबरणार नाही. पाकिस्तानविरोधात कुणाचे काही मनसुबे असतील तर ते उधळून लावू,’ असं या दोघांनी सांगितलं.

तसंच, भारतीय राजकारणी संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचं उल्लंघन तर करत आहेतच शिवाय दुसर्‍या राष्ट्रांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यातही त्यांना अभिमान वाटतोय, हे खेदजनक आहे. पाकिस्तानकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत कुणी करू नये असंही पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहील शरिफ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये धडक कारवाई केली आणि भारताच्या या कारवाईने पाकिस्तानचंही धाबं दणाणलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ, तसंच तिथले संरक्षण मंत्री, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या ISI आणि पाकिस्तानी लष्कराचे अधिकार्‍यांची महत्त्वाची बैठक होणाराय. या बैठकीत भारताच्या या कारवाईचा आढावा घेतला जाणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *