बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रॉपर्टी खटल्यात अनोखळी व्यक्तीची लूडबूड

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रॉपर्टी खटल्यात अनोखळी व्यक्तीची लूडबूड

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रॉपर्टी खटल्यात अनोखळी व्यक्तीची लूडबूड सुरु असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. अज्ञात व्यक्तीकडून प्रत्येक सुनावणीनंतर नोंदवलेल्या पुराव्यांची मागणी होत असल्याचं सांगत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांच्यात बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीवरुन वाद सुरु आहे. या खटल्यातील सुनावणीनंतर अनोळखी व्यक्ती चेंबरमध्ये येऊन नोंदवलेल्या पुराव्यांची प्रत मागत असल्याचं न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी सांगितलं.

जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्राला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल या खटल्याची सुनावणी करत आहे. परंतु त्यांनी आज जयदेव ठाकरेंच्या वकील सीमा सरनाईक आणि उद्धव ठाकरेंचे वकील राजेश शाह यांना सांगितलं की, एका अज्ञात व्यक्तीने माझ्या चेंबरमध्ये येऊन या प्रकरणात नोंदवलेल्या पुराव्यांची प्रत मागितली आहे.

हा अज्ञात व्यक्ती 4 वेळा माझ्या चेंबरमध्ये आला. सरनाईक यांच्या ऑफिसमधील असल्याचं सांगत त्याने पुरावे मागितले. तो नक्की कोण आहे आणि पुरावे मागण्यामागे त्याचा काय उद्देश आहे, याची मला कल्पना नाही. परंतु हे प्रकरण थांबायला हवं, असं न्यायमूर्ती पटेल म्हणाले.

उच्च न्यायालयाने जयदेव यांच्या वकील सरनाईक आणि उद्धव यांचे वकील शाह यांना या अनोळखी व्यक्तीचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहे. वकिलांनी त्यांच्या ज्युनिअर्सच्या नावे पत्र लिहून हे पुरावे गोळा करण्यासाठी कोण आलं होतं, याचा शोध घ्यावा असं म्हटलं आहे. तर ओळखपत्र दाखवल्याशिवाय ज्युनिअर वकिलांच्या हाती कोणतेही पुरावे सोपवू नये, असं वकिलांनी सुचवलं आहे.

या खटल्यात 2007 पासून बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉ. जलील पारकर यांचा जबाब कोर्टाने नोंदवला आहे. उच्च न्यायालय 30 जून रोजी शिवसेना नेते अनिल परब यांचा जबाब नोंदवणार आहे.

13 डिसेंबर, 2011 रोजी  बनवलेल्या बाळासाहेबांच्या मृत्युपत्रात माझ्या नावावर फार कमी संपत्ती ठेवल्याचा आरोप करत जयदेव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बाळासाहेबांची प्रकृती स्थिर नसताना उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे मृत्युपत्रावर बाळासाहेबांची जबरदस्तीने स्वाक्षरी घेतल्याचा दावा जयदेव यांनी केला आहे. बाळासाहेब यांचं निधन 17 नोव्हेंबर, 2012 रोजी झाला होता आणि त्यांच्या मृत्युपत्रात उद्धव ठाकरे यांना प्रॉपर्टीचा मोठा वाटा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *