आरे बाबत अफवा पसरवू नका, मुख्यमंत्र्यांनी खडसावलं

आरे बाबत अफवा पसरवू नका, मुख्यमंत्र्यांनी खडसावलं

आरे कॉलनीतील जागा मेट्रो कारशेडला देण्याचा निर्णय घेतला असल्याचं दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. याला काही वेळ होत नाही तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट करुन असा कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू असं ट्विट केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि सर्वात ज्येष्ठ मंत्री एकनाथ ख़डसे यांच्यात एकवाक्यता नाही हे स्पष्ट झालं आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ ख़डसे यांच्यामध्ये असलेलं कुरघोडीचं राजकारण पुन्हा एकदा समोर आलंय.

मुंबईत गोरेगावमध्ये आरे कॉलनीत मेट्रो 3 साठी कारशेड प्रकल्पामुळे 2 हजारांपेक्षा जास्त झाडांची कत्तल होणार होती. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी याला कडाडून विरोध करत आंदोलनं केली. एवढंच नाहीतर मनसे आणि शिवसेनेनंही विरोध केला. पण, आज एकनाथ खडसे यांनी मेट्रो कारशेड आरेमध्येच होणार असं जाहीर करून टाकलं.

एकनाथ खडसे म्हणतात, “आज आरे संदर्भात बैठक झाली. मेट्रोच्या प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील 30 हेक्टर जागा देण्याचं ठरवलं आहे. हा निर्णय आघाडी सरकारने जुलै 2014 मध्ये घेतला होता. मात्र, जागा अजून त्यांच्या ताब्यात दिलेली नाही, पर्यावरण आणि अन्य व्यक्तीचा त्याला विरोध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं आहेत, या झाडांची कत्तल होईल अशी भीती आहे, आज या संदर्भात एमएमआरडीएचे अधिकारी, आरेचे अधिकारी यांच्यासमवेत पाहणी केली, चर्चा केली. या ठिकाणी जेवढी झाड आहे, त्यापेक्षा तिपट्ट झाडे लावली पाहिजे, जगवली पाहिजे, जी हानी होईल ती भरुन दिली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मी त्यांना दिल्या. एमएमआरडीएने तिपट्ट झाड लावण्याचा, जगवण्याचं लेखी स्वरुपात लिहून दिलं आहे. दुसरी मोठी जागा मुंबईत उपलब्ध नाही, त्यामुळे झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी केल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय घावा लागला.

मुख्यमंत्र्यांची गुगली

पण, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका असं ट्विट करून खडसेंची घोषणा खोडून काढली. मुख्यमंत्री म्हणतात, आरेची जमीन मेट्रो कारशेडला देण्याबाबत असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *