गेली अनेक वर्षे दुष्काळाला सामोरे जाणा-या महाराष्ट्राला हवामान विभागाने दिलासादायक बातमी दिली. यंदा राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.
पण पावसाचा अतिवृष्टीचा हा अंदाज लक्षात घेता समुद्रसपाटीच्या पातळीत वसलेल्या मुंबईनगरीसाठी ही धोक्याची घंटाही आहे. यंदाच्या पावसाळ्यात ४ जून ते २२ ऑगस्ट दरम्यान उधाण भरतीच्या वेळा असून वेळीच योग्य ते नियोजन करत काळजी घेण्याचे आवाहन पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यास दा. कृ. सोमण यांनी केले आहे.
पावसाळ्यात एक मुसळधार सर कोसळल्यावर अवघी मुंबापुरी तुंबते. अशावेळी समुद्राला येणा-या उधाण भरतीमुळे पावसाचे पाणी समुद्रात न जाता तुंबून राहते. मुंबईत अतिवृष्टीसोबत समुद्राला येणा-या उधाण भरतीच्या घटना पाहता मुंबई संपूर्ण जलमय झाल्याचे आढळले आहे.
रस्त्यावर पाणी साचल्यास वाहतूक धीम्या गतीने होते, रेल्वेमार्गात पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक ठप्प होते. समुद्राला येणा-या उधाण भरतीच्या वेळी जर अतिवृष्टी झाली तर मुंबईत पावसाचे पाणी साचून राहाते. यंदा जून, जुलै व ऑगस्टमध्ये साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा अपेक्षित आहेत. यंदा जून ते ऑगस्ट दरम्यान १९ दिवस उधाण भरतीचे आहेत.

