श्री सदस्यांचे स्वच्छता अभियान ‘लिम्का बुक’मध्ये

श्री सदस्यांचे स्वच्छता अभियान ‘लिम्का बुक’मध्ये

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्यावतीने विविध शासकीय संस्थांच्या सहकार्याने १६ नोव्हेंबर २०१४ रोजी एकाच दिवशी महाराष्ट्रातील २१ शहरांमध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाची नोंद २०१६ च्या ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. या अभियानात ५६४५ किलोमीटरचे रस्ते स्वच्छ करत त्यातून सुमारे ३ टन कचरा गोळा करण्यात आला होता.

राज्यपाल विद्यासागर राव यांनी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची राज्याचे स्वच्छतादूत म्हणून निवड केल्यानंतर श्री सदस्यांमध्ये उत्साह पसरला. याचाच एक भाग म्हणून १६ नोव्हेंबर २०१४ रोजी एकाच दिवशी महाराष्ट्रातील २१ शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबवले होते. यात राज्यातील विविध शासकीय संस्थांचे सदस्य आणि श्री सदस्य अशा दोन लाख ५ हजार स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. त्यांनी ५६४५ किलोमीटरचे रस्ते स्वच्छ केले. या यशस्वी स्वच्छता अभियानाची नोंद २०१६ च्या ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे. ‘लिम्का बुक’च्या ‘विकास’ (डेव्हलपमेंट) या भागातील रेकॉर्डमध्ये हे अभियान समाविष्ट करण्यात आले आहे.

रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी अध्यात्मातून समाजसेवेच्या रुपाने लावलेल्या रोपट्याचे आता प्रतिष्ठानरुपी वटवृक्षात रुपांतर झाले आहे. नानासाहेबांचा वारसा त्यांचे सुपुत्र डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी यशस्वीरित्या सुरू ठेवला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठान अध्यात्मातून कर्मयोगाकडे वाटचाल करत आहे. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षलागवड व संवर्धन, रक्तदान शिबिर, प्रौढशिक्षण अभियान असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून ‘स्वच्छता अभियान’देखील या उपक्रमांपैकी उपक्रम आहे. धर्माधिकारी कुटुंबियांच्या मागे श्री सदस्यांची मोठी ताकद आहे. आप्पासाहेबांच्या तोंडून निघालेला शब्द श्री सदस्यांसाठी प्रमाण असतो. तो पाळण्यासाठी श्री सदस्य जीवाचे रान करतात.

‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना १ मे २००८ रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित करण्यात आला. मात्र डॉ. नानासाहेबांचे ८ जुलै २००८ रोजी निधन झाले. त्यामुळे २५ नोव्हेंबर २००८ रोजी खारघर, नवी मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता. त्या सोहळ्याला उपस्थित श्री सदस्यांनी गर्दीचे सर्व विक्रम तोडले होते. चार लाखांपेक्षा जास्त लोकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. त्याची नोंद २०१० च्या ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली होती.

आरोग्य ‘महाशिबिर’

नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने २० डिसेंबर २०१४ रोजी मोफत आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले होते. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, नेरुळच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात दीड लाखांहून अधिक लोकांची एकाच दिवशी आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्याची नोंद ‘लिमका बुक ऑफ रेकार्ड’मध्ये करण्यात आली होती. रायगड, मुंबई, ठाणे, पुण्यासह महाराष्ट्रभरातून लोकांनी या शिबिरात सहभाग घेतला होता. १२०० डॉक्टर्स, ५ हजारांपेक्षा जास्त पॅरामेडीक्स आणि स्वयंसेवक लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर होते. तर तब्बल १६ विभागांमध्ये विभागणी केलेले ५०० नोंदणी कक्ष रुग्णांची आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी उभारण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *