गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या विजय मनोहर पाटील (वय 34, रा. कागवाडे मळा, इचलकरंजी) व कुदरत अब्दुल मुजावर (29, रा. खोतवाडी) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि जिवंत काडतूस असा सुमारे 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांनी हे पिस्तूल कोणाकडून घेतले, याचा तपास पोलिस करीत आहेत.
शहरात दोन तरुण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी महासत्ता चौकात सापळा रचला. त्यावेळी केस्तीज हॉटेलसमोर दोन तरुण संशयितरीत्या फिरताना दिसून आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे एक पिस्तूल आणि जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे. दरम्यान, यापूर्वीही इचलकरंजी शहरात पिस्तूल खरेदी-विक्रीची तस्करी मोठ्या प्रमाणात होत होती. पोलिसांनी जवळपास वीसहून अधिक पिस्तूल जप्त केली होती. पिस्तूल तस्कर मनीष नागोरी याने या पिस्तूल विकल्याचे स्पष्ट झाले होते. सोमवारच्या कारवाईनंतर या खरेदी-विक्रीच्या प्रकरणात नागोरीचा सहभाग आहे का, त्यादृष्टीनेही पोलिस तपास करीत आहेत.