बुधवारपासून ब्रॅण्डेड दुधाच्या विक्रीवर बहिष्कार

बुधवारपासून ब्रॅण्डेड दुधाच्या विक्रीवर बहिष्कार

दूध कंपन्या आणि वितरक यांच्यातील कमिशनवरून सुरू असलेला वाद अद्याप शमला नसून योग्य तोडग्याअभावी बुधवारपासून पुन्हा ब्रॅण्डेड दुधाच्या विक्रीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय वितरकांनी घेतला आहे. ठाणे शहर दूध विक्रेता कल्याणकारी संघाने हा निर्णय घेतला असून बुधवारपासून पुन्हा ठाणेकरांना दूधकोंडीला सामोरे जावे लागणार आहे. महानंदने मात्र एमआरपी वाढवून विक्रेत्यांना कमिशन वाढवून दिल्याने महानंद वगळून अमूल, गोकुळ, वारणा व मदर डेअरी या अन्य कंपन्यांचे दूध विक्री थांबवण्याचा निर्णय दूध विक्रेता संघाने घेतला आहे.
दूध कंपन्या वितरकांना अत्यल्प कमिशन देत असल्याने विक्रेत्यांना एमआरपीवर एक ते दोन रुपये अधिकचे शुल्क आकारावे लागत होते. अधिकच्या शुल्काविरोधात ग्राहक संघटनांनी आवाज उठवल्याने वैधमापन शास्त्र विभागाने एमआरपीपेक्षा जास्त दराने दूध विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली होती. कारवाईचा बडगा उगारल्याने गोंधळलेल्या विक्रेत्यांनी दूध कंपन्यांकडे जास्तीच्या कमिशनची मागणी सुरू केली होती. मागणी मान्य होत नसल्याने या विक्रेत्यांनी ब्रॅण्डेड दूध कंपन्यांच्या दूध विक्रीवर एप्रिल महिन्यात बहिष्कार टाकला होता. त्यामुळे ठाणेकरांना ब्रॅण्डेड दूध मिळणे बंद झाले होते. हा तिढा सोडवण्यासाठी मंत्रालयात झालेल्या बैठकीत १५ दिवसांमध्ये दूध विक्रेत्यांच्या कमिशनबद्दल सकारात्मक निर्णय देण्याचे अश्वासन दूध कंपन्यांकडून मिळाले होते. त्यामुळे ठाणे शहर दूध विक्रेता कल्याणकारी संघाने पुकारलेला बहिष्कार स्थगित केला होता. मात्र दिलेली मुदत ओलांडली तरी निर्णय होत नसल्याने संघाने पुन्हा एकदा बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *