ड्रम, बाटल्यांपासून बनविली चिमण्यांसाठी घरटी

उष्णतेचा तडाखा वाढल्याने अंगाची काहिली होत आहे. सिन्नरच्या पूर्व भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. अशा परिस्थितीत माणसे, जनावरे व पशूपक्षी यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. माणसे कसेतरी पाणी मिळवितात. परंतु, अबोल पक्ष्यांना पाणी व चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे पाथरे (ता. सिन्नर) येथील बाळासाहेब कुमावत या माध्यमिक शिक्षकाने टाकाऊ ड्रम, कॅन, बाटल्या यांचा वापर करून चिमण्यांसाठी वीसपेक्षा जास्त छोटी-छोटी घरटी बनविली आहेत.

त्यांनी ही घरटी आपल्या घराशेजारील झाडे, गहिनीनाथ महाराजाचे मंदिर, शाळेचा परिसर त्याचबरोबर स्वत: कार्यरत असलेल्या देवपूर विद्यालयाच्या परिसरात लावली आहेत. या घरट्यांवर चिमण्यांची चित्रे लावून घरट्यांची आकर्षकता वाढविली आहे. घरट्यांमध्ये रोज पाणी व धान्य ठेवले जाते. त्यामुळे विसाव्यासाठी या घरट्यांकडे येणाऱ्या पक्ष्यांची तहान व भूक भागविली जाते. पत्नी प्रियंका यांच्या मदतीने श्री. कुमावत आपल्या घराच्या परिसरात लावलेल्या घरट्यांमध्ये रोज पाणी व धान्य ठेवतात, तर देवपूर येथील विद्यालयाच्या प्रांगणात ठेवलेल्या घरट्यांची जबाबदारी विद्यार्थी व शिक्षक पार पाडीत आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या घोषणांचे फलक या घरट्यांच्या शेजारी लावल्याने प्राणिमात्रांची काळजी करा, असा संदेश दिला जात आहे. या उपक्रमात त्यांना मुख्याध्यापक सुनील गडाख, पर्यवेक्षक परशराम रानडे आदींसह विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

मुक्‍या पक्ष्यांना थोडा वेळ विश्रांती घेता यावी, त्यांना पाणी व चारा मिळावा या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे सध्या दुर्मिळ झालेल्या पक्ष्यांचा चिवचिवाट या घरट्यांजवळ ऐकावयास मिळतो. याचा मोठा आनंद होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *