सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सुरू असलेल्या पाच हजार कोटींच्या रस्ते आणि पायाभूत सुविधा कामांवरून होणाऱ्या टीकेला आयुक्त मनीषा खत्री यांनी सडेतोड उत्तर दिले. सिंहस्थाच्या कामांमध्ये गुणवत्तेच्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड केलेली नाही. सिंहस्थ कामांच्या निविदाप्रक्रियेबाबत आणि दर्जाबाबत विरोधकांनी पुराव्यासह चूक दाखवून द्यावी. या कामांमध्ये एक जरी चूक काढून दाखवली, तर मी माझे नाव बदलेन, असे खुले आव्हान आयुक्त मनीषा खत्री यांनी टीकाकारांना दिले.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात १२३० कोटी रुपये खर्चून २९ रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यासोबत पाणीपुरवठा, मलनि:स्सारण आणि रस्ते मिळून सुमारे पाच हजार कोटींची कामे सुरू आहेत. परंतु, या कामांच्या दर्जाबाबत सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळातून टीका सुरू आहे.
महापालिका आयुक्त म्हणून माझे सर्वांना आव्हान आहे. महापालिकेची निविदा कागदपत्रे ऑनलाइन वेबसाइटवर टाकली आहेत. कामांमध्ये पूर्णत: पारदर्शकता ठेवली आहे. ज्यांना तपासायचे आहे, त्यांनी जरूर कामे तपासावीत. त्यांनी चूक काढून दाखवावी. आम्ही कुठे चुकलो आहोत, ते शोधून दाखवावे. त्यानंतर आम्ही योग्य की अयोग्य, हे लोकांच्याच लक्षात येईल, असे खत्री यांनी स्पष्ट केले. सिंहस्थ कामांच्या गुणवत्तेबाबत आपण कोणतीही तडजोड केलेली नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
सिंहस्थाच्या कामांवर आम्ही कठोरपणे लक्ष ठेवून आहोत. सोशल मीडियावर ‘काय विकास सुरू आहे,’ असा प्रश्न विचारला जातो. माझे सर्वांना पुन्हा एकदा खुले आव्हान आहे, कुंभमेळ्याच्या कामात एक जरी चूक काढून दाखवा, मी माझे नाव बदलेन, असे त्यांनी सांगितले. कुंभमेळ्यासाठी होणारी कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
