मोबदल्यावरुन 12 गावे एकवटली; 3 कोटी दराच्या जमिनीला रेल्वेकडून 19930 हेक्टरचा दर, गोंदियात आंदोलनातून रोष

गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या गुदमा-प्रतापबाग या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींचा बाजारभाव तीन कोटी रुपयांपर्यंत आहे. बाजारभावाच्या पाच पट मोबदल्याची शेतकऱ्यांची मागणी असतानाही रेल्वे प्रशासनाकडून शेतकऱ्यांना केवळ १९ हजार ९३० रुपये प्रति हेक्टरचा दर दिला जात आहे.

हा अन्याय असल्याचा आरोप करीत सुमारे १२ गावांतील शेतकरी सोमवारी एकत्र आले. त्यांनी गोंदिया-बालाघाट मार्गावरील कटंगी नाका चौकात रास्तारोको आंदोलन करीत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. या आंदोलनाने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

भूसंपादनाची प्रक्रिया पारदर्शक करावी, बाजारभावानुसार मोबदला द्यावा, शेतकऱ्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावे या प्रमुख मागण्यांसाठी ‘किसान जमीन बचाओ संघर्ष समिती ’च्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात कटंगी कला, नागरा, हलबी टोला, सावरी, गर्रा, गोंदिया खुर्द, पोवारी टोला, दतोरा, खमारी, चुलाद यांसह परिसरातील इतर गावांतील शेतकरी सहभागी झाले. सरकारकडून आपल्या मागण्यांसंदर्भात दखल घेतली जात नसल्यावरून या गावांमध्ये रोष असल्याने गावकरी एकत्र येऊ लागले. सकाळपासून गावातून निघालेले हे शेतकरी दुपारच्या सुमारास कटंगी नाका परिसरात एकवटले. महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्यांनी भजन गात, काळे रुमाल आणि काळ्या फिती बांधून शांततापूर्ण मार्गाने निषेध नोंदविला.

संघर्ष समितीच्यावतीने अखिलेश सेठ, प्रा. अमित बुद्धे, राजेश नागरिकर, नंदू बिसेन, कार्तिक चव्हाण, मोहिनी वराडे, गोल्डी गावंडे, गोपाळ चुटे यांच्यासह अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

कटंगी कला येथे २३ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत सर्व भूधारकांनी रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला मोबदला अमान्य करण्याचा एकमुखाने निर्णय घेतला होता. हा मोबदला अन्यायकारक असून, शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गदा आणणारा असल्याचा आरोप समितीने केला. त्यानंतरही प्रशासनाकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने रास्तारोको आंदोलन करण्यात आल्याचे समितीने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *