अंबरनाथ, बदलापूरमध्ये गेल्या काही वर्षांत रिक्षांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यात जुन्या रिक्षांही मोठ्या प्रमाणात आहेत. याच रिक्षांमधून प्रवासी वाहतूक होत आहे. मात्र, आरटीओ आणि वाहतूक विभागाकडून या रिक्षांवर कारवाईला केली जात नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे परिवहनमंत्री यांच्या आदेशानंतर तरी यंत्रणा या रिक्षांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अल्पवयीन मुले रिक्षा चालवतात
अंबरनाथ, बदलापूर विस्तारत आहे. मात्र, दोन्ही शहरांत पालिकांची परिवहन सेवा नाही. त्यामुळे नागरिकांना रिक्षा या एकमेव सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते. प्रवाशांची वाढती संख्येच्या प्रमाणात रिक्षांचीही संख्या वाढत चालली आहे. मात्र, यात मुंबई आणि उपनगरांत ‘स्क्रॅप’ ठरवलेल्या शेकडो रिक्षा अंबरनाथ, बदलापूर शहरांतील रस्त्यांवर धावत आहे. तसेच परवाना आणि गणवेश नसलेली अल्पवयीन मुले या रिक्षा चालवत असल्याचेही बोलले जाते.
जीव धोक्यात घालून प्रवास
रोजच्या धावपळीत असलेले चाकरमानी घराजवळ जाण्यासाठी तसेच संध्याकाळी आणि रात्री उशिरा कामावरून परतल्यानंतर घर गाठण्यासाठी मिळेल त्या रिक्षातून प्रवास करतात. मात्र, पाच प्रवासी वाहतूक करणाऱ्या आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घालून चालणाऱ्या या बेकायदा स्क्रॅप रिक्षांवर कारवाईची मोहीम राबवण्याबाबत आरटीओ तसेच वाहतूक विभागाचे अधिकारी नेहमीच उदासीन असतात, असा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.
याबाबत कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
‘आता तरी कारवाई करा’
नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्यास्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी धोका ठरत आहेत. याबाबत प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ५ ऑक्टोबरपासून विशेष मोहीम राबवण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत. त्यामुळे आता तरी यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
