जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून, आज त्यांच्या उपोषणाचा अकरावा दिवस आहे. उपोषणामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावत असतानाही जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे. जरांगे यांच्या प्रकृतीची चिंता लक्षात घेता राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव आंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले असून, त्यांना सलाईन लावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील 4 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी सलाईन, पाणी आणि इतर वैद्यकीय उपचार घेणे बंद केले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. उपोषणस्थळी उपस्थित डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत होते. काल रात्री मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या संवादानंतर जरांगे पाटील यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास सहमती दर्शवल्याची माहिती आहे. त्यानंतर मध्यरात्री सुमारे 2 वाजेच्या सुमारास उपोषणस्थळीच त्यांना सलाईन लावण्यात आली. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आज अकरावा दिवस असून, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अन्न-पाण्यासह वैद्यकीय उपचारांबाबतही कठोर भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मात्र, प्रकृती खालावल्यानंतरही उपोषणाचा निर्णय आणि मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर त्यांची भूमिका अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर रात्री वर्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी विविध मंत्र्यांची बैठक पार पडली. यामध्ये जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी काय पावले उचलली जावीत, याबाबत सविस्तर विचारमंधन करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, अंतरवाली सराटी येथे मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित असून, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे. त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच समर्थकांमध्येही चिंता निर्माण झाली होती. आता मध्यरात्री उपचार घेण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर काहीसा दिलासा मिळाला असला, तरी त्यांची प्रकृती आणि पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
