सलग तिसऱ्या वर्षी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा विदर्भ, मराठवाड्यासह काही जिल्ह्यांना तडाखा बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाने हिसकावाला आहे. एकीकडे दुष्काळग्रस्तांना सावरण्यासाठी सरकार आणि स्वंयसेवी संघटना प्रयत्न करीत असतानाच संकटाची मालिका काही शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आज दुसऱ्या दिवशीही राज्याच्या काही भागांत पाऊस आणि गारपीट सुरूच होती.
पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मराठवाडा, नाशिक, विदर्भात पावसाबरोबच गारपीट होऊ लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. यंदा बेताचाच पाऊस झाल्याने खरीप हंगामातही शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही. खरिपापाठोपाठ आलेल्या रब्बीत काही तरी हाती लागेल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अवकाळीने आणि गारपिटीने पाणी आणले. रब्बीतील हरभरा, गहू, ज्वारीबरोबच भाजीपाला, द्राक्षे, संत्री, डाळिंब, केळीचे पीक हाताशी आले होते. विदर्भ, मराठवाडा, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक आदी भागांत पाऊस झाल्याने पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, खानापूर, जत, तासगाव तालुक्यांतील काही गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला. जत तालुक्यातील संख, पांडोझरीला जोरदार पाऊस झाला. गोंधळेवाडी गावात जोरदार वारे व पावसामुळे सात एकर द्राक्षबाग कोसळली. तसेच खानापूर तालुक्यातही गारांचा पाऊस झाला. तर, तासगावमध्ये पाऊस झाल्याने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. कवठेमहांकाळ, तासगाव, जत तालुक्यांत बेदाण्याचे मोठे नुकसान झाले. तसेच सातारा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांत मुसळधार पाऊस झाला. महामार्गावर खिंडवाडी ते शिवराज पेट्रोलपंपापर्यंत पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक विस्कळित झाली होती. पुणे जिल्ह्यातील बारामतीसह काही भागांत पाऊस झाला आहे.
विदर्भात गारपीट
विदर्भात अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार, चिखलदरा परिसर, वर्धा जिल्ह्यातील कारंजा आणि नागपूर जिल्ह्यात मौदा, सावनेर तालुक्यात गारपीट झाली, तर धामना परिसरात अवकाळी पावसाला सुरवात झाली. सावनेर तालुक्यात बोराएवढ्या गारा पडल्याने पिकाचे नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा व चांदूरबाजार तालुक्यांत गारपिटीसह आलेल्या वादळाने अनेक घरांची पडझड झाली आहे, तर शेतात उभा असलेला हरभरा, गहू, कांदा व संत्रा आदी पिके जमीनदोस्त झाली आहेत.
विदर्भातील यवतमाळ, वाशीम, नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत पाऊस आणि गारपिटीने रब्बी पिके, फळे व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. काढणी झालेली तूर, तसेच शेतात रब्बी गहू, भाजीपाला पिके, तसेच फळपिकांना गारपीट व पावसाने दणका दिला. तसेच संत्री, डाळिंब, केळीच्या बागांना फटका बसला आहे. मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत कालच्या (शनिवारी) पावसाने केळी, गव्हाचे मोठे नुकसान झाले.
गुरुवारपर्यंत पावसाची शक्यता
पूर्वेकडून वाहणारे उष्ण वारे, दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून पश्चिम मध्य प्रदेशापर्यंत हवेच्या कमी दाबामुळे तयार झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. गुरुवार (ता. 3)पर्यंत राज्यात काही ठिकाणी, तसेच येत्या मंगळवारपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.